Rajendra Patil yadravkar : राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणतात, फक्त 'या' कारणाने एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला!
शिरोळचे आमदार आणि माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना अपक्ष असूनही मंत्रिपद शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनीही बंड केल्याने सर्वांच्याच राजकीय भूवया उंचावल्या होत्या.
Rajendra Patil yadravkar : शिवसेनेत बंडाळी करून स्वपक्षाचे सरकार पाडलेल्या शिंदे गटातील आमदार आता मतदारसंघात परतू लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर,माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेले राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत.
शिरोळचे आमदार आणि माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना अपक्ष असूनही मंत्रिपद शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनीही बंड केल्याने सर्वांच्याच राजकीय भूवया उंचावल्या होत्या. आता त्यांनी मतदारसंघात परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा का दिला? याचा खुलासा केला आहे.
ते म्हणाले की, राज्यात अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून शिवसेनेला पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिल्यानंतर 72 तास शिवसेनेचा पाठिंबा नसलेले सरकार स्थापन झाले होते. त्यामुळे सत्ता येणार की नाही? हे माहीत नसतानाही पाठिंबा दिला होता. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मतदारसंघातील विकासकामातील अडथळ्यांवर त्यांनी सहकार्य केल्याने त्यांना पाठिंबा देणे क्रमप्राप्त होते.
मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा नाही
उद्धव ठाकरे यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा त्यांनी फोन केला नसल्याचे यड्रावकर म्हणाले. मंत्रिपदाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मला काय यापेक्षा तालुक्यासाठी काय हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ते योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मी गुवाहाटीमध्ये असतानाही कार्यकर्त्यांच्या आणि मतदारसंघात संपर्कात होतो, त्या कालावधीमध्येही 7 रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्याचे ते म्हणाले. मतदारसंघात मोर्चा काढण्याची गरज नव्हती असेही ते म्हणाले.आपली बंडखोर आमदार म्हणून नव्हे, तर विकासात्मक आमदार म्हणून जिल्ह्यासह तालुक्याला होईल असा दावाही त्यांनी केला.
मतदारसंघाचा घेतला आढावा
विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर मी लगेच मतदारसंघातच निघालो. गेला महिना पूर्णत: मान्सूनचा महिना कोरडा गेला. दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे सर्वाधिक धोका हा माझ्या तालुक्याला होतो त्यामुळे मी पहिला माझ्या मतदारसंघाकडे जाण्याचा मी निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे मी रात्री निघालो आणि सकाळी मतदारसंघांमध्ये एकंदरीत मतदारसंघाचा आढावा घेतल्याचे यड्रावकर यांनी सांगितले.