Lumpy Skin Disease : कोल्हापुरातील दूध कट्टे बंद ठेऊ नका, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांकडून कोल्हापूर मनपाला पत्र
लम्पीचा प्रादुर्भाव फक्त गायींमधून होत असल्याने कोल्हापूर शहरात दूध कट्ट्यांवर म्हशींना बंदी करू नये, असे पत्र जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. वाय. ए. पठाण यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला दिलं आहे.
Lumpy Skin Disease : कोल्हापूर जिल्ह्यामध्येही लम्पी चर्मरोगाचा वेगाने प्रसार होत असल्याने पशुधन मालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा प्रादुर्भाव फक्त गायींमधून होत असल्याने कोल्हापूर शहरात दूध कट्ट्यांवर म्हशींना बंदी करू नये, असे पत्र जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. वाय. ए. पठाण यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला दिलं आहे. कोल्हापूरचे दूध कट्टे ही कोल्हापूरची विशेष ओळख आहे.
पठाण यांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गोठ्यांमध्ये पाहणी केली असता म्हशींमध्ये लागण झाल्याचे दिसून आलेलं नाही. तसेच म्हशींच्या आजारांसाठीच्या नमुन्यांची तपासणी केली असता ते निगेटिव्ह आले आहेत. लम्पी हा जनावरांच्या त्वचेचा रोग आहे. या रोगाचा प्रसार दुधातून होत नाही. जनावरांचे दूध उकळून पिल्यानंतर गुणधर्म वाढतात. या रोगाची जिल्ह्यातील म्हशींना लागण झाली नसल्याने शहरातील दूध कट्टे बंद करण्यात येवू नयेत. त्यांना मोकळीक द्यावी, असे पठाण यांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये लम्पीचा प्रसार
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये लम्पीने पाय पसरले आहेत. हातकणंगले, शिरोळ, कागल, आजरा आणि शाहूवाडी तालुक्यात लम्पी चर्मरोगाचा शिरकाव झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील तीन गायी या रोगाची लागण झाल्याने मृत्यूमुखी पडल्या.
कागल तालुक्यामध्ये सहा गायींना लागण झाली आहे, शिरोळ तालुक्यात 12 गायींना लागण झाली आहे. शाहूवाडी लम्पीसदृश्य गाय आढळून आली आहे, तर आजरा तालुक्यातील दोन गायींना लागण झाली आहे. दुसरीकडे पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्यासाठीही जोरदार मोहिम राबवली जात आहे. जिल्हा परिषद, गोकुळ तसेच पशुसंवर्धन विभागाकडून लस मोहीम राबवण्यात येत आहे.
लम्पीचा प्रसार रोखा
लम्पी हा आजार विषाणूजन्य असून संसर्गजन्य असल्याने रोगाचा प्रसार माशा, डास, गोचिड, चिलटे तसेच बाधित जनावरांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे गावागावात फवारणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या