Ambabai Mandir : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पल स्टँड काढण्यावरून वाद, महिलांना अश्रु अनावर
अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टॅन्ड काढण्यावरुन वाद सुरु झाला आहे. खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पलस्टँड काढण्यावरून वाद सुरु झाला आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये (Ambabai Mandir) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी चप्पल स्टँड सुविधा करण्यात आल्यानंतर मंदिराच्या भिंतीलाच खेटून असलेल्या दुकानांवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या (Kolhapur Municipal Corporation) अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आल्यानंतर मोठा राडा झाला.
या ठिकाणी खासगी दुकानदार आणि अतिक्रमण विभागाची चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी महिलांनी दुकाने काढण्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाला महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. महानगरपालिकेने जेसीबी आणून अंबाबाई मंदिराच्या भिंतीला लागून असलेली सर्वच दुकाने हटवली. यावेळी दुकानदारांनी कारवाई करण्यास विरोध केला. मात्र, अतिक्रमण विभागाने आपली कारवाई सुरूच ठेवत भिंतीला लागून असलेली सर्वच दुकाने काढली.
महिलांनी यावेली कडाडून विरोध केला. काही महिलांना अश्रु अनावर सुद्धा झाले. आम्ही जायचे तरी कोठे? अशी विचारण त्यांनी यावेळी केली. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून आमची दुकानं या परिसरात असून अचानक या पद्धतीने कारवाई का करण्यात येत आहे? असा सवाल त्यांनी केला.
आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांना सुविधा देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून दर्शन रांग सुद्धा वाढवण्यात आली आहे. शेतकरी संघाची इमारत सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे. तिथूनच दर्शन रांग सुरू होणार आहे. नवरात्रोत्सवासाठी मंदिरामध्ये स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर दागिन्यांची सुद्धा स्वच्छता करण्यात आली आहे. ही सर्व मोहीम सुरू असताना चप्पल हटवण्यावरून चप्पल स्टँड हटवण्यावरून विरोध झाला आहे.
नेमका वाद काय? खासगी दुकानदारांचा विरोध का?
अंबाबाई मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी चप्पल स्टँड लावले आहेत. हे स्टँड हटवण्यासाठी प्रशासनाने आज कारवाईला सुरुवात केली. मात्र त्याला खासगी दुकानदारांनी विशेषत: महिलांनी जोरदार विरोध केला. करवीर निवासी अंबाबाई मंदिराची भिंत आहे. त्या भिंतीला लागूनच हे खासगी चप्पल स्टँड आहे. हे चप्पल स्टँड काढण्यासाठी आज मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईला सुरुवात केली. नवरात्रोत्सवाच्या तोंडावरुन मंदिर परिसरात साफसफाई सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाईही सुरु केली आहे. अंबाबाई मंदिराच्या तोंडावर जी मूळ भिंत आहे, ती भिंत भाविकांना दिसायला हवी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र या भिंतीला लागूनच चप्पलांचे स्टँड आहेत. त्यामुळे मूळ बांधकाम नेमकं कसं आहे, मंदिराची रचना कशी आहे, हे या चप्पलस्टँडआड झाकलं गेलं आहे. तिकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवं आणि अधिकृत चप्पल स्टँड उभं केलं आहे. मात्र जे खासगी चप्पल स्टँड आहे त्यामुळे मंदिराचं मूळ बांधकाम झाकलं होतं. तेच हटवण्याचा प्रयत्न मनपाने केला.
खासगी दुकानदारांचा विरोध का?
दरम्यान, आम्ही गेल्या 20-25 वर्षांपासून इथे चप्पलस्टँड लावत आहोत, हे चप्पलस्टँड हटवलं तर आम्ही करायचं काय असं या दुकानदारांचं म्हणणं आहे. या कारवाईविरोधात आम्हाला नोटीस वगैरे काही दिलं नाही. आम्हाला सरकारने न्याय द्यावा. आमचं 15-20 जणांचं चप्पलस्टँड आहे, हे सर्व प्रकरण कोर्टात आहे, तरीही मनपाने कारवाईला सुरुवात केली आहे, असा आरोप खासगी चप्पल स्टँड मालकांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या