BJP Morcha in Kolhapur : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी काय करणार आहात ? श्वेतपत्रिका सादर करा, भाजपची टाहो मोर्चात मागणी
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपने (BJP Morcha in Kolhapur) आक्रमक भूमिका घेत आज दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर टाहो मोर्चा काढला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेत आज दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर टाहो मोर्चा काढला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.राज्य सरकारला काम करण्याची इच्छाच नाही, पुरग्रस्तांना पुरेशी मदत दिलीच नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. येत्या 2 ते 3 दिवसांत प्रशासनाने श्वेतप्रत्रिका प्रसिद्ध करून काय झाल्यास काय करणार आहात याची माहिती द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
गेल्यावर्षी ठाकरे सरकारकडून पुरग्रस्तांना तुटपूंजी मदत करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पुरग्रस्तांना तातडीने मदत केल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, 2005 नंतर प्रथमच 2019 मध्ये महापुराचे संकट कोसळल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी पुरग्रस्तांना नियोजन करून मदत केली होती. घराचे नुकसान झाल्यास 95 हजार, घर दुरुस्तीसाठी 50 हजार, दुकानदारांना 50 हजार, रोज 60 रुपये प्रमाणे निर्वाहभत्ता दिला होता. कपडे आणि भांडी वाहून गेल्यानंतरही मदत केली होती. 2019 च्या महापुरातून 2021 च्या महापुरासाठी तयारी करायला हवी होती, पण ती झाली नाही. त्यावेळची मिळालेली मदत ही तुटपूंजी होती.
पूर आल्यास काहीच तयारी नाही
चंद्रकांत पाटील यांनी संभाव्य पुरस्थिती लक्षात घेऊन काहीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप केला.महामार्गावरील पुर टाळण्यासाठी 5 कोटींची गरज आहे, पण ते सुद्धा खर्च करण्याची यांची तयारी नसल्याचे ते म्हणाले. हे केल्यास महामार्गावरील पुरस्थिती टाळता येईल, असे त्यांनी सांगितले. पुरस्थिती निर्माण झाल्यास लोकांना कोणत्या ठिकाणी स्थलांतरित करणार आहात ? त्यांच्या औषधाचे काय, जनावरांना उंचीवर नेण्यासाठी काय करणार आहात ? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी यावेळी केली.
हे ही वाचलं का ?