![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur Election : कोल्हापूर दक्षिणमध्ये पुन्हा काट्याची लढाई, धनंजय महाडिकांनी थेट उमेदवाराचं नाव सांगितलं!
Dhananjay Mahadik Vs Satej Patil : भाजपसोबत गेल्यानंतर कोल्हापूर दक्षिणेच्या जागेवर शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दावा केला होता.
![Kolhapur Election : कोल्हापूर दक्षिणमध्ये पुन्हा काट्याची लढाई, धनंजय महाडिकांनी थेट उमेदवाराचं नाव सांगितलं! bjp dhananjay mahadik announced amal mahadik to be candidate against congress kolhapur satej patil news update Kolhapur Election : कोल्हापूर दक्षिणमध्ये पुन्हा काट्याची लढाई, धनंजय महाडिकांनी थेट उमेदवाराचं नाव सांगितलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/b31aec538900e47840bc7d701624866e169572480267393_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर: राज्यातील लक्षवेधी असणाऱ्या कोल्हापूर दक्षिणेच्या विधानसभेच्या युद्धातले उमेदवार ठरले आहेत. काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांचे पुतणे ऋतुराज पाटील आणि त्यांचे कट्टर विरोधक खासदार धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक (Amal Mahadik) हे पारंपरिक विरोधक एकमेकांना भिडणार असल्याचं स्पष्ट झालंय. कोल्हापूर दक्षिणेची जागा ही शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांना मिळणार नाही, तर भाजपचे अमल महाडिकच या ठिकाणी निवडणूक लढतील असं खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी ठासून सांगितलं आहे.
कोल्हापूरचं राजकारण सध्या पुन्हा एकदा बंटी आणि मुन्नाच्या भोवताली फिरत असल्याचं दिसून येतंय. त्यात त्यांचा कस लागणार आहे तो कोल्हापूर दक्षिणेच्या जागेवर... कारण या जागेवर सतेज पाटलांचा उमेदवार ठरला आहे. पण महायुती झाल्याने ही जागा भाजप लढवणार की शिंदेंची शिवसेना हे अद्याप स्पष्ट नव्हतं. आता धनंजय महाडिकांच्या वक्तव्यानंतर याबाबत स्पष्टता आल्याचं दिसून येतंय.
Dhananjay Mahadik On Satej Patil : नेमकं काय म्हणाले धनंजय महाडिक?
कोल्हापुरातील पत्रकारांशी संवाद साधताना खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं की, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघावर शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर यांनी आपला दावा सांगितलेला आहे. राजेश क्षीरसागर हे आमच्या सोबत आहेत. मात्र दक्षिण मतदारसंघात यापूर्वी भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदार संघातून अमल महाडिक हेच निवडणूक लढवतील आणि ते जिंकूनही येतील. दक्षिणचे लोक हे महाडिकांसोबतच आहेत, असा विश्वास महाडिकांनी व्यक्त केला.
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी भाजपच्या अमल महाडिकांच्या विरोधात आपल्या पुतण्याला निवडणुकीत उतरवलं होतं. त्यावेळी काँग्रेसचे ऋतुराज पाटील मोठ्या फरकाने निवडून आले होते. विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलेल्या महाडिकांना सतेज पाटलांनी लोकसभेतही आस्मान दाखवलं होतं.
कोल्हापूर दक्षिणेचं राजकारण तापणार
एकेकाळी एकमेकांचे कट्टर मित्र असलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातून आता विस्तवही जात नाही. त्यामुळे कोल्हापुरातील एखाद्या गावातील संस्था असो वा विधानसभा, हे दोन्ही विरोधक एकमेकांवर तुटून पडतात. शिंदे गटाने भाजपसोबत युती केल्यानंतर ही जागा आपल्याला मिळावी यासाठी माजी आमदार राजेश क्षीरसागर हे प्रयत्नशील होते. पण खासदारकीचं बळ मिळालेल्या महाडिक गटाने पुन्हा एकदा कंबर कसली असून सतेज पाटलांच्या पुतण्याला पराभूत करण्याचा, पर्यायाने सतेज पाटलांच्या राजकारणाला लगाम घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
त्यातूनच अजून निवडणूक जाहीर झाली नसतानाही, ही जागा कुणाच्या वाटेला जाणार हे माहिती नसतानाही खासदार धनंजय महाडिकांनी या ठिकाणचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे कोल्हापूर दक्षिणेमध्ये पुन्हा एकदा मुन्ना आणि बंटी यांच्यातील राजकीय युद्ध पाहायला मिळणार हे नक्की.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)