Raju Shetti on Ratnagiri Ban : अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल; राजू शेट्टींचा रत्नागिरी बंदी आदेशावरून इशारा
माजी खासदार राजू शेट्टी यांनी रत्नागिरी जिल्हाबंदीच्या आदेशानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारसूत अन्यायग्रस्तांच्या लढ्याला पाठिंबा द्यायला जाणारच असल्याचे राजू शेट्टी यांनी प्रशासनाला कळवले आहे.
Raju Shetti on Ratnagiri Ban: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी रत्नागिरी जिल्हाबंदीच्या आदेशानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनाई आदेश मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. तसेच राजू शेट्टी बारसूत अन्यायग्रस्तांच्या लढ्याला पाठिंबा द्यायला जाणारच असल्याचे कळवले आहे.
राजू शेट्टी काय म्हणाले?
जिल्हा प्रशासनाच्या नोटिशीला उत्तर देताना राजू शेट्टी यांनी म्हटले आहे, की शेतकऱ्यांच्या न्याय लढ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये जाणार आहे. आपण मनाई आदेश करू नये, अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. राजू शेट्टी यांच्यामार्फत अॅड. असिम सरोदे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना हा इशारा दिला आहे. राजू शेट्टी यांना रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बारसूत भेट देण्यास मनाई आदेश काढला आहे. तसेच सोशल मीडियावरही कोणत्याही प्रकारचे पोस्ट करण्यास देखील मनाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीशीला राजू शेट्टी यांनी उत्तर पाठवले आहे.
नोटिसीला दिलेल्या उत्तरात राजू शेट्टी म्हणतात, राजू शेट्टी चळवळीमध्ये तसेच सक्रिय राजकारणात कधीच असंसदीय शब्दांचा वापर केलेला नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमीच लढा देत आले आहेत. तसेच त्यांना सोशल मीडियावरही प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे. भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार राजू शेट्टींना बारसू येथे जाण्यास तसेच प्रतिक्रिया देणेचा अधिकार आहे. त्यांच्या विरोधात काढण्यात आलेला आदेश बेकायदेशीर असून सदर मनाई आदेश तातडीने मागे घ्यावा अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल.
उद्धव ठाकरे 6 तारखेला बारसूला जाणार
दरम्यान, मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या ठिकाणी बोलणार, तुम्ही मला कोण अडवणारे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निर्धार केला आहे. बारसूमधील लोकांना मी भेटणार आणि त्यांच्याशी बोलणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं आव्हान स्वीकारलं आहे. मी ती जागा सूचवली होती, पण त्याठिकाणी पोलिसांना पाठवा, लाठीमार करा असं लिहिलं होतं का? सर्वमान्यता मिळाली तरच बारसूत रिफायनरी होणार असेही ठाकरे म्हणाले आहेत. बारसूची जागा उद्धव ठाकरे यांनीच सुचवल्याचे पत्र शिंदे फडणवीस सरकारकडून दाखवण्यात आल्यानंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
इतर महत्वाच्या बातम्या