(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar on Keshavrao Bhosale Natyagruha : कितीही पैसा लागू दे, जसं होतं तसंच केशवराव भोसले नाट्यगृह उभं करा; अजितदादांकडून स्पष्ट निर्देश
Ajit Pawar on Keshavrao Bhosale Natyagruha : कोल्हापूरमध्ये पोहोचताच अजितदादा यांनी थेट केशवराव भोसले नाट्यगृह गाठले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर दादांनी अतिशय बारीक-सारीक गोष्टींची पाहणी केली.
कोल्हापूर : कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी (Ajit Pawar on Keshavrao Bhosale Natyagruha) 20 कोटींपेक्षा कितीही रक्कम लागू दे सरकार द्यायला तयार आहे. मात्र केशवराव भोसले नाट्यगृह जसं होतं तसं बनवा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये पोहोचताच अजितदादा यांनी थेट केशवराव भोसले नाट्यगृह गाठले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर दादांनी अतिशय बारीक-सारीक गोष्टींची पाहणी केली.
कामामध्ये कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये
नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच भेट दिली होती. यावेळी अजितदादा पवार यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मंजूलक्ष्मी आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत याच्याकडून घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेतली. शिवाय नाट्यगृहाची पुनर्बांधणी करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याच्या सूचना केल्या. कामामध्ये कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये, नाट्यगृह जसं पूर्वी होतं तशाच पद्धतीने बनवा. त्यासाठी सरकार वाटेल ती मदत करायला तयार असल्याचे अजितदादा म्हणाले. वास्तू पुन्हा उभी करत असताना नेमकी कशी काळजी घ्यावी हे देखील सांगितले. त्याचबरोबर शाहु खासबाग मैदानाची पाहणी करत असताना अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. जुन्या वास्तूवर अशा प्रकारे गवत वाढू देवु नका अशा सूचनाही दिल्या.
नाट्यगृह युद्ध पातळीवर पुन्हा उभारण्यात येणार
दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं. हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची आर्थिक देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. त्यांनी आगीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले की, केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना आहे. हे नाट्यगृह युध्दपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार 25 कोटी रूपयांची गरज आहे. नाट्यगृहाचा विमा 5 कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कलाकारांशी संवाद साधून त्यांना धीरही दिला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, नाट्यगृहे अनेक असतात पण काही नाट्यगृहांशी कलावंत आणि श्रोत्यांचं जिव्हाळ्याचं नातं असतं. जशा कोल्हापूर वासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत. अनेक कलावंताची मागणी आहे की, हे नाट्यगृह जसं पूर्वी होतं तसंच पुन्हा उभं राहावं. मदतीसाठी मला खूप फोन आले, खूप मेसेजेस आले. शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारं असून कलावंत आणि श्रोत्यांचादेखील आदर करणारं शासन आहे.
इतर महत्वाच्या बातम्या