Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात गव्यांचा (Gaur in Ajara Tehshil kolhapur) धुमाकूळ सुरुच आहे. तालुक्यात भावेवाडीत गवा आल्याने ग्रामस्थांची चांगलीच भंबेरी उडाली. गव्याला हुसकावून लावताना एका महिला थोडक्यात बचावली. गेल्या काही महिन्यांपासून नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीत गवा येण्याचे प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यात वाढले आहे. (Gaur in Ajara Tehshil kolhapur)


काल दुपारी भावेवाडीत गवा आल्याचे समजताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. यावेळी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दिशेनं हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर गवा पळत सुटला. त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गावातील महिलेला गव्याच्या मागून भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आणि ओरडणाऱ्याचा ग्रामस्थांचा आवाज आल्याने जीवाच्या आकांताने बाजूला पळाली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रस्ता पार केल्यानंतर गवा जंगलात दिशेने निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


सातत्याने मानवी वस्तीत गवा येत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गवा आणि मानवी संघर्ष कारणीभूत आहे. नैसर्गिक अधिवासात तयार झालेल्या मानवी वस्त्या आणि बेसूमार जंगलतोडीने प्राणी वारंवार रस्त्यावर येऊ लागले आहेत. सहा महिन्यांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू झाला होता. 


जोतिबाच्या पायथ्याजवळ पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन


गव्याचा मुक्त संचार असा सुरु असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील गिरोली-पन्हाळा मार्गावरील सरकाळा परिसरात 10 ऑक्टोबर रोजी जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी पुन्हा बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले होते. बिबट्याच्या हल्ल्याची कोणतीही घटना अद्याप समोर आलेली नाही. मात्र, मनुष्य-प्राणी संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्राण्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिकांमधून होऊ लागली आहे. मात्र, वन अधिकाऱ्यांनी या भागामध्ये फार पूर्वीपासून बिबट्याचा अधिवास असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये, असे म्हटले आहे.  


यापूर्वी 22 सप्टेंबर रोजी ज्योतिबा टेकडीच्या पायथ्याशी एका खडकावर विसावलेल्या वाघाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर एका गावकऱ्याने दावा केला होता, की त्याने वाघ पाहिला आहे. पुरावा म्हणून गावकऱ्यांनी अस्पष्ट फोटो आणि व्हिडिओ दाखवले. वनविभागाने मात्र, वाघाचे अस्तित्व नाकारून तो बिबट्या असल्याचा दावा केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या