Raju Shetti : गेल्या दोन वर्षांच्या अविरत संघर्षानंतर शेतकऱ्यांचे प्रोत्साहानपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीच्या तोंडावर जमा झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. काल कोल्हापूर जिल्ह्यातही पहिल्या टप्प्यात एक लाख, 13 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर 409 कोटी प्रोत्साहनपर लाभ अनुदान जमा झाले आहे.    


दरम्यान, या पैशावर सणाच्या तोंडावर बँकांनी डल्ला मारू नये, यासाठी हे अनुदान मिळण्यासाठीच आक्रमक भूमिका घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी कर्जाच्या रुपात हे पैसे वळते करून घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच त्यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, अडीच वर्ष प्रदीर्घ संघर्ष करून शेतकऱ्यांना  प्रोत्साहानपर 50 हजार मिळवून दिले आहेत. आयत्या बिळात नागोबा या म्हणीप्रमाणे बँकांनी ते कर्जाला जमा करू नयेत, शेतकऱ्यांना सुखाने दिवाळी साजरी करू द्या, अन्यथा बँकांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. 



दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या एकूण तीन लाख, एक हजार, 280 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने थकीत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 आणली होती. यामध्ये जिल्हा बँकेशी संलग्न एकूण 31,138 शेतकऱ्यांना 157 कोटी रुपये कर्जमुक्ती मिळाली होती. त्याचवेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नियमितपणे कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान देण्याचे घोषित केले होते. दरम्यान; कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे ते देता आले नव्हते. 


इतर महत्वाच्या बातम्या