Kolhapur Municipal Corporation : दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत कोल्हापूर मनपाकडून शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी दिवाळी फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हे फेस्टीवल राजारामपुरी पहिली गल्ली, जनता बझार समोरील राजाराम गार्डन येथे आयोजित करण्यात आले आहे. 


या फेस्टीवलचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून व उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या नियंत्रणखाली फेस्टिवल घेण्यात येत आहे. यामध्ये 45 महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव व व्यावसायिकता वाढविण्यासाठी मनपामार्फत मागील वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीही महिला बचत गटांमार्फत बनवण्यात येणाऱ्या वस्तू, खाद्यपदार्थ व महिलांच्या कौशल्याला वाव मिळण्यासाठी आयोजित केले आहे.


या फेस्टिवलमध्ये आपणास मातीच्या शोभेच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, बांबू व खनापासून बनवलेले आकाश दिवे, पणत्या, शोभेच्या वस्तू, तोरण, हँडक्राफ्ट, फाब्रिक ज्वेलरी, शुभेच्छा बॉक्स, पापडाचे व लोणच्याचे विविध प्रकार, कापडी पिशव्या, झाडू, हळद, विविध प्रकरच्या  चटण्या, लोणचे, रोपवाटिका सेंद्रिय खत तसेच खास खवय्यासाठी खाद्य मेजवाणीमध्ये, थालीपीठ, पुरणपोळी, खर्डा भाकरी, खांडोळी, डोसा, पाणीपुरी, स्प्रिंग पोटॅटो, सोलापुरी भाकरी, चिकन, बिर्याणी, वडा-कोंबडा उपलब्ध असणार आहे.


शहरवासियांनी राजारामपुरी पहिली गल्ली येथील राजाराम हॉल गार्डन येथील बचत गटांच्या दिवाळी फेस्टिवलला भेट देवून आपली दिवाळी खरेदी इथेच करावी व या महिलांच्या प्रयत्नांना हातभार लावावा असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.


विशेष कॅम्पमध्ये चार दिवसात 58 मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी 


दरम्यान, कोल्हापूर मनपाच्या घरफाळा विभागाकडून आयोजित विषेश कॅम्पमध्ये चार दिवसांमध्ये 58 मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली. शहरातील ज्या मिळकतींवर (इमारतींवर) खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप मिळकतींवर मालमत्ता कराची आकारणी करुन घेतलेली नाही अशा मिळकतधारकांसाठी सोमवार ते गुरुवार कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या चार दिवसांच्या कॅम्पमध्ये एकूण 58 मिळकतींना घरफाळ आकारणी करुन देण्यात आली, तर 18 मिळतींनी आपले अर्ज सादर केले आहेत. या अर्जाची तपासणी करुन अपूर्ण कागदपत्र मागणी बाबत जागेवर नोटीस देण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांची पुर्तता होताच संबंधित मिळतींना कराची आकारणी करुन दिली जाणार आहे.


या मोहिमेंतर्गत गुरुवारी छ.ताराराणी मार्केट येथे घरफाळा विभागाने विषेश कॅम्पमध्ये नवीन कर आकारणी करण्याकरीता 1 मिळकतधारकांने अर्ज सादर केला होता. तसेच मागील आठवड्यापर्यंत घरफाळा विभागाकडे प्राप्त झालेल्या एकूण 7 अर्जदारांकडून योग्य त्या कागदपत्राची पुर्तता करुन घेवून नवीन 7 मिळकतींची कर आकरणी अंतिम करुन देण्यात आली. यावेळी कर अधिक्षक विजय वणकुद्रे यांनी दिवसभर कार्यालयात उपस्थित राहून नागरीकांच्या तक्रारीचे निवारण केले. 


इतर महत्वाच्या बातम्या