Warana Milk Rate Hike : गोकुळनंतर आता वारणा दूध संघानेही (Warana Milk) गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ करत उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर दिलासा दिला आहे. वारणाकडून गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर 3 रुपये, तर म्हशीच्या दुधास प्रतिलिटर 2 रुपये दरवाढ देण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष, आमदार विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केली. ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे.


विनय कोरे यांनी निर्णयाची माहिती देताना सांगितले की, शेतकऱ्यांना दूध दरवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. गाय दूधासाठी 3.5 फॅटला व 8.5 एस.एन.एफ.ला 35 रुपये दर झाला आहे. म्हशीच्या दुधासाठी 6.0 फॅट व 9.0 एसएनएफला 47.50 पैसे इतका दर मिळणार आहे. वारणा दूध संघाकडून वर्षभरात गाय दुधास 9 रुपये, तर म्हशीच्या दुधास 8 रुपये दरवाढ दिली आहे. सध्या संघाच्या दूध व दूध पावडरला वाढीव मागणी प्राप्त झाली आहे. संघाची दही, लस्सी, ताक, श्रीखंड, आम्रखंड या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचेही कोरे यांनी सांगितले.


दीड लाखांवर मोफत लस


दरम्यान, वारणा दूध संघाने जनावरांमधील लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरणासाठी मोहीम राबवताना दीड लाखांवर मोफत लस जनावरांना दिली. अमृत पशुधन सुरक्षा कवच योजनेतून 30 लाख रुपयांचे अनुदान दूध उत्पादकांना दिले आहे. अल्पदरात पशुवैद्यकीय सेवा व रेडी संगोपनसारखे उपक्रम संघामार्फत राबविले जात असल्याचे कार्यकारी संचालक येडूरकर यांनी सांगितले.  दुसरीकडे, दिवाळी सणाच्या तोंडावर ही दरवाढ मिळाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


गोकुळकडून दिवाळीच्या तोंडावर गोकुळचा दूध उत्पादकांना दिलासा; ग्राहकांना मात्र झटका!


वाळीच्या तोंडावर गोकुळने दूध उत्पादकांना दिलासा देताना ग्राहकांना मात्र झटका दिला आहे. गोकुळने म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 3 रुपये तर खरेदी दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे. नव्या दराची अंमलबजावणी आजपासूनच होणार आहे. दुसरीकडे गायीच्या दुधाच्या खरेदी दरात 3 रुपयांनी वाढ होईल. गायीच्या दूध विक्री दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 


नव्या दरवाढीमुळे कोल्हापूरमध्ये म्हशीचे दूध ग्राहकांना 60 ऐवजी 63 रुपये लिटर या नव्या दराने उपलब्ध होईल. कोल्हापूरमध्ये म्हशीचे दूध ग्राहकांना 30 ऐवजी 32 रुपये अर्धा लिटर या दराने मिळेल. दुसरीकडे मुंबई, पुण्यात गोकुळच्या म्हशीच्या एक लिटर दुधाची किंमत 66 रुपयांवरुन आता 69 रुपयांवर जाईल. अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 33 रुपयांवरुन 35 रुपयांवर पोहोचली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या