Jalana: नव्या संसद भवनासह देशातील 4 राज्यांत समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत, यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भाष्य केलं आहे. समान नागरी कायद्याचा मसुदा तयार होऊन जनतेसमोर ठेवला जाईल त्यावेळी त्यावर पुढील भाष्य केलं जाईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यातील बदनापूरमध्ये बोलत होते.
रविवारी (28 मे) नवीन संसदेचं उद्घाटन होत आहे आणि या सभागृहाचा प्रत्येकाने मान राखला पाहिजे, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली. नवीन संसदेच्या उद्घाटनाला विरोध करणं विरोधकांना शोभत नाही, पण विरोधक नवीन कुठला तरी मुद्दा काढून त्यावर चर्चा घडवून आणतात, असा टोलाही दानवे यांनी विरोधकांना लगावला आहे.
नवी दिल्लीत नव्या संसद भवनाची (Parliament Building) भव्यदिव्य अशी इमारत उभारण्यात आली आहे, या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nrendra Modi) यांच्या हस्ते सकाळी करण्यात येईल. यासाठी संसद भवनात सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. होम-हवनापासून ते राजदंडाची प्रतिष्ठापना करण्यापर्यंतचे सर्व विधी या उद्घाटनाच्या वेळी करण्यात येणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
कसा असणार संपूर्ण सोहळा?
हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी सध्या दिल्लीमध्ये तयारी सुरु आहे. 28 मे रोजी सकाळी तमिळनाडूतील मठाचे 20 साधू-संत वैदिक विधींनुसार लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल म्हणजेच राजदंड लावतील. त्यानंतर सर्वधर्मीय प्रार्थना सभा करण्यात येईल. या सोहळ्याला शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सर्व धर्माचे गुरु सहभागी होणार आहेत.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील. तसेच उभसभापती हरिवंश हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन देखील करतील. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात राष्ट्रगीताने होईल. यावेळी नाणे आणि टपाल तिकीट देखील काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी 75 रुपयांचे नाणे देखील काढण्यात येईल. तर दुपारी अडीच या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
कशी आहे ही नवी इमारत?
ही संसदेची नवी इमारत चार मजली आहे तर या संसदेला सहा प्रवेशद्वार आहेत. या संसद भवनात लोकसभेचे एक हजार आणि राज्यसभेचे जवळपास 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील. तसेच या बाकांमध्ये हजेरी,मतदान तसेच भाषांतर ऐकण्यासाठी आत्याधुनिक सुविधा असतील. याशिवाय या संसद भवनात 120 कार्यालयं आणि म्युझियम तसेच गॅलरीही असतील.
हेही वाचा: