Unseasonal Rain in Marathwada: सूर्य आग ओकत असून, पावसाळा सुरु होण्यासाठी अवघ्या पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. मराठवाड्यात (Marathwada) वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असून परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या काही भागात मंगळवारी मध्यम ते मुसळधार अवकाळी पाऊस झाला. तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, उन्हाच्या चटक्यांमुळे दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील झाले असून रात्री उकाडा त्रस्त करीत आहे. असे असताना दुसरीकडे काही भागात पाऊस होत आहे.


परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी....


परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे येथील आठवडे बाजारात ग्राहक आणि व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे आठवडे बाजारातील वडाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या, तसेच त्याच्याच बाजूला असलेले लिंबाच्या झाडाची फांदी तुटल्याने विजेच्या तारा तुटल्या. भाजीपाला विक्रेत्यांची पालं उडून गेली. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गावातील अनेक घरांवरचे पत्रे उडून गेली. जिंतूर, सेलू तालुक्यातही पाऊस पडताना पाहायला मिळाला. 


जालन्याच्या भोकरदनला जोरदार पाऊस


परभणी प्रमाणे जालना जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरासह फत्तेपूर, विरेगाव, मासनपूर आदी भागात दुपारी विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. पावसाने सखल भागात पाणी साचले होते.


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अवकाळी पावसाची हजेरी 


दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. तर फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळली. वीज पडल्याने एक बैल दगावला.


धाराशिव जिल्ह्यातही पाऊस 


मंगळवारी मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली असताना, धाराशिव जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा शिवारात सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. शेतशिवारांतील झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी विद्युत खांबही आडवे झाले आहेत.


पूर्णा शहर अंधारात


नांदेड व हिंगोलीतून येणारा भूमिगत केबल जळाल्याने परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहराचा वीजपुरवठा 24 तासांपेक्षा अधिक काळी खंडित होता. उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा. लागला. छत्रपती संभाजीनगर येथून केबल आण्यासाठी महावितरणचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.


वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू


परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. जिंतूर तालुक्यातील काही भागांत मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. द्र्म्यना निवळी-खुर्द येथे वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण साहेबराव ठोंबरे (वय 55 वर्षे) असे मृताचे नाव आहे. शेतातील झाडाला बांधलेले दोन बैल सोडण्यासाठी ठोंबरे गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. या घटनेत एक बैल दगावला. बाजूलाच असलेले मुंजाभाऊ अंभोरे हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Maharashtra Mansoon : राज्यात पावसाची स्थिती काय, मान्सून कधी दाखल होणार; पंजाबराव डख यांनी वर्तवला असा अंदाज