Aaditya Thackeray Rahul Kanal:  मागील वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत बंड झाल्यावर मोठ्या प्रमाणावर फूट पडली. त्यानंतर शिवसेना पक्षासह युवा सेना आणि इतर संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर आउटगोईंग सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्वातील युवा सेनेतही मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी युवा सेनेतील प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक अमेय घोले (Amey Ghole) यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता ठाकरे यांचा आणखी एक निकटवर्तीय युवा सेनेला रामराम करण्याची शक्यता आहे. राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी युवा सेनेचा कोअर ग्रुप (Yuva Sena Core Team Group)सोडला आहे. 


एकनाथ शिंदे हे आमदारांसह बाजूला झाले त्याचवेळी युवा सेनेतल्या पदाधिकाऱ्यांनीही ठाकरेंची साथ सोडली. आता या घटनेला जवळपास 9 महिने होत आले आहेत. पण, आजही नाराजीचा सूर कमी होताना दिसत नाही. एकेकाळी आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावणारे युवा सैनिक आजही नाराज दिसत आहेत. युवा सेनेतल्या एका महत्वाचा सैनिक असलेल्या राहुल कनाल यांनी युवा सेनेच्या कोअर टीमच्या व्हॅाट्स अप ग्रुप सोडला असल्याने चर्चा सुरू झाली आहे. 


राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तींयांपैकी एक मानले जातात. पक्ष, संघटनेच्या अंतर्गत सुरु असलेल्या कुरघोड्यामुळे राहुल कनाल यांनीही नुकताच कोअर कमिटीचा व्हॅाट्स अप ग्रुप सोडला आहे. आदित्य ठाकरेंची कोअर कमिटी ही युवा सेनेची ताकद मानली जाते. पण, एक-एक मोहरे कोअर कमिटीतून बाहेर जात असल्यानं आदित्य ठाकरेंची चिंता वाढली आहे. 


कोण आहेत राहुल कनाल? Who is Rahul Kanal


राहुल कनाल यांना उद्योजक म्हणून ओळखलं जातं. युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी आहेत. त्याशिवाय, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असताना राहुल 
शिर्डी देवस्थान समितीवर सदस्य राहिले आहेत. कनाल हे  मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य होते. त्याशिवाय शिक्षण समितीवरही त्यांची वर्णी लागली होती. 


राहुल कनाल यांचे सलमान खान सारख्या अनेक सेलिब्रिटींबरोबर निकटचे संबंध आहेत. एवढचं नाही तर विराट कोहली सारख्या क्रिकेटसोबतही खास संबंध आहेत. उच्चभ्रूंमध्ये चांगले संबंध  असणाऱ्या राहुल कनाल यांनी कोरोना महासाथीच्या काळात रात्री अपरात्री लोकांना अन्नधान्य औषधं देण्याचं कामही केले आहे. 


कनाल नाराज का? 


आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले राहुल कनाल नाराज का झालेत याचीच चर्चा जोरात सुरू झाली आहे. राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंसाठी काम करतात. पण सध्या आदित्य राज्याच्या राजकारणात व्यस्त आहे. त्यामुळे इतर युवा सेनेचे पदाधिकारी पक्षात ढवळाढवळ करत असल्याचं कनाल यांना पटत नाही. याच कारणावरून राहुल कनाल यांनी ग्रुप सोडला असल्याची माहिती आहे. 


आरोपांच्या फैरी...आयकर विभागाचा छापा


काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या पथकाने राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला होता. पण त्यात काहीच समोर आलं नाही.  आमदार नितेश राणे यांनी कनाल यांचा संबंध दिशा सॅलियन आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणाशी संबंध जोडला होता. पण त्यातही पुढे फार काही झालं नाही. जिकडे जिकडे आदित्य ठाकरेंवर आरोप होतात त्या त्या वेळी राहुल कनाल याचं नाव जोडलं जायचं पण आता राहुल कनाल नाराज असल्यानं पुढे काय करणार? पुढची राजकीय वाटचाल काय असणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. 


ठाकरेंकडून समजूत


कोअर कमिटीचा ग्रुप सोडल्यानंतर ठाकरे कुटुंबियांनी राहुल कनालची समजूत काढल्याचे समजतंय.  अडचणीत असलेल्या ठाकरेंना प्रत्येक शिवसैनिक महत्वाचा आहे. एकीकडे पक्षात इनकमिंग सुरु असताना आऊटगोईंग परवडणारं नाही, याची त्यांनाही जाणीव आहे. पण पक्षातले लोक वारंवार नाराज का होतात? कुणामुळे होतात याचा शोध घेणं गरजेच असल्याची चर्चा सुरू आहे.