"मंत्रीपदाला काय करता, मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो"; शिंदे गटातील आमदाराच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
MLA Kishor Appa Patil on Shinde Government : नायक चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे शिंदे गट आणि भाजपच्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, असं म्हणत किशोर पाटलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नायक चित्रपटातील अभिनेत्याची उपमा दिली.
MLA Kishor Appa Patil on Shinde Government : मला मंत्रीपद मिळालं नसल तरी मी नाराज नाही, कारण मी स्वत: ला मुख्यमंत्री समजत असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील (Kishor Appa Patil) यांनी केलं आहे. नायक चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे शिंदे गट आणि भाजपच्या (BJP) उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, असं म्हणत किशोर पाटलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नायक चित्रपटातील अभिनेत्याची उपमा दिली.
शिंदे गटाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बोलताना म्हटलं की, "अडीच वर्षात जेवढ काम झालं नाही, तेवढ काम 100 दिवसांत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीतील सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्याच्या विकासाचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. 100 दिवसातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला कारभार म्हणजे, नायक या हिंदी चित्रपटाचा प्रत्यय येतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमदार किशोर पाटील यांनी नायक चित्रपटाच्या अभिनेत्याची थेट उपाधी देऊन टाकली आहे, तर दुसरीकडे अडीच वर्षात त्यांना जे जमलं नाही, ते आमच्या सरकारनं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांनी करुन दाखवलं.", असा टोलाही आमदार किशोर पाटील यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
शिंदे सरकारला 100 दिवस पूर्ण झालं, त्यावर आमदार किशोर पाटील हे बोलत होते. 100 दिवसांत सरकारनं शेतकरी असो इतर असे राज्याच्या विकासासासाठीचे महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितलं. इंधनदरवाढीवरुन आम्ही नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात बोंबा मारायचो. मात्र सरकारनं कधी त्यांचा वाटा उचलला नाही, आमच्या सरकारनं सत्ता स्थापन होताच, सर्वात आधी इंधनदरवाढ कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार किशोर पाटील म्हणाले. दिवाळी पॅकेटच्या माध्यमातून गोरगरीबांची दिवाळी गोड करण्याचंही कामही या सरकारनं केलं असल्याचं आमदार किशोर पाटील म्हणाले.
मंत्रीपदाला काय करता.. मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो : आमदार किशोर पाटील
मंत्री पद न मिळाल्यानं नाराजी असल्याची चर्चा असून यावर आमदार किशोर पाटील यांना विचारलं असता, "मी कधीही नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं. मंत्रीपदाला काय करता... मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो, असंही आमदार किशोर पाटील स्पष्ट केलं आहे. मी निश्चितपणे मंत्रीपदासाठी शर्यतीत आहे. मंत्रीपदाची संधी मिळाली तर त्याचं सोन करेन, जे खातं मिळेल, त्या माध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय घेईन, असंही आमदार किशोर पाटील म्हणाले. एकीकडे नाराज नसल्याचं आमदार किशोर पाटील सांगतात, तर दुसरीकडे मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं सांगत मंत्रीपदाची अपेक्षाही व्यक्त करतात.
"संजय सावंतांना म्हणाले, कॅबीन मिनिस्टर"
शिंदे गटाच्या आमदारांना आगामी निवडणुकांमध्ये धुळ चारु, असा इशार उध्दव ठाकरे गटाचे जळगाव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिला आहे. यालाही आमदार किशेार पाटलांनी उत्तर दिलं आहे. "जे नेतृत्व करत होते, ते पाचही आमदार शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे आमदार नाही, कुणी नेता नाही, बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते अन् पदाधिकारी यांच्याकडे आहेत. मग कोणाच्या विश्वासावर हे आम्हाला धुळ चारण्याच्या गोष्टी करतात, असं जोरदार उत्तर आमदार किशोर पाटील यांनी संजय सावंत यांना दिलं आहे. 24 तास काम करावं लागतं, नुसत कॅबीनमध्ये बसून होत नाही, हे कॅबीन मिनिस्टर आहेत, आमच्या भरवशावर यांचं दुकान चालतं, असं म्हणत आमदार किशोर पाटील हे नाव न घेता संजय सावतांना कॅबीन मिनिस्टर असं म्हणाले आहेत.
"उद्धव ठाकरेंचा 'तो' निर्णय शिवसेनेला अधोगतीकडे नेणारा"
शिंदे गटाचे आमदार हे सातत्यानं उध्दव ठाकरेंवर टीका करत असतात. आमदार किशोर पाटील यांनीही उध्दव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंचा आगामी काळात महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढण्याचा निर्णय शिवसेनेला अधोगतीकडे नेणारा आहे, असं मत आमदार किशोर पाटील म्हणाले. पुढच्याला ठेच लागली की, मागचा शहाणा होतो. मात्र त्यांना ठेचांवर ठेचा लागताहेत, तरी हे शहाणे होणार नसतील, तर परमेश्वर यांचं भलं करो, अशीही टीका आमदार किशोर पाटील यांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.