Maratha Reservation : मराठा समाजाला झुलवत ठेऊ नका, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांनी आरक्षणाचा शब्द पाळावा; एकनाथ खडसे यांची मागणी
Eknath Khadse : चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्हिडीओ जर संजय राऊत यांच्याकडे असेल तर त्यांनी तो समोर आणावा, जनतेला काय खरं आणि काय खोटं आहे ते समजेल असं राष्ट्रवादीचे आमदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जळगाव : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलं नाही तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadanvis) यांनी मागील काळात केले होते, त्यामुळे देवेंद्र फडणीस यांनी आपला शब्द पाळावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी आता राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी संकटमोचक म्हणून नावारूपाला आलेल्या मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही यातून मार्ग काढावा असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांना राज्य सरकारच्या भूमिकेवर चांगलीच टीका केली.
एकनाथ खडसे म्हणाले की, मराठा आरक्षण देण्या संदर्भात सरकारने सुरुवातीला काही दिवसांची मुदत मागितली होती, त्यांनतर पुन्हा त्यांनी मुदत वाढून घेतली असल्याने साहजिकच आरक्षण मिळण्यासंदर्भात मराठा समाज्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे सरकारने लवकर निर्णय घ्यावा. सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर बिहारच्या धर्तीवर 16 टक्के जास्तीचं कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यायला पाहिजे. मात्र मराठा समाजाला वारंवार झुलवत ठेवणे आणि खेळवत राहणे राजकीय दृष्ट्या योग्य नाही.
जालना येथील पोलीस अधीक्षक यांच्याबदली बाबत आपण आताच काही बोलू शकत नाही. कारण बदली ही प्रशासकीय बाब आहे असं एकनाथ खडसे म्हणाले.
बावनकुळेंचा व्हिडीओ असेल तर समोर आणावा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या व्हायरल फोटोवर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांचे केसिनोमधील फोटो संजय राऊत यांनी वायरल केला आहे. अजून काही व्हिडीओ त्यांच्या जवळ असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी त्यांच्या जवळील क्लीप समोर अणावी, म्हणजे खरं काय ते जनतेसमोर येई. मात्र महाराष्ट्र संकटात असताना एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने असे करणे नाही.
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पुरेसा भाव मिळत नसल्याने अडचण वाढली आहे. मागील वर्षी बारा हजार भाव मिळाला होता. आता तोच भाव सात हजार रुपये क्विंटल आहे. हा भाव शेतकऱ्यांना परवडत नसल्याने त्यांनी कापूस दिला नाही. त्यामुळे 80 टक्के मिल बंद पडल्या आहेत. सरकार अजूनही त्याकडे लक्ष देत नाही. सरकारने कापसाला बारा हजार रुपये भाव द्यावा किंवा पाच हजार रुपये प्रती क्विंटल अनुदान तरी द्यावे अशी मागणी खडसे यांनी केली आहे
सध्याचा भाव पाहता ही शेतकऱ्यांची टिंगल टवाळी केल्यासारखे आहे अशी टीकाही त्यांनी केली.