जळगावात गुलाबरावच काय त्यांच्यापेक्षा चांगले उमेदवार देऊन ते विजयी करु : विलास पारकर
आमदारांच्या बंडखोरीमुळे जळगावात शिवसेना दुबळी झालेली नाही. गुलाबरावच काय त्यांच्यापेक्षा चांगले उमेदवार देऊ आणि निवडून आणू, असा निर्धार रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी व्यक्त केला.
जळगाव : एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष संकटात सापडला आहे. जळगाव जिल्ह्यातही पाच आमदारांनी बंडखोरी केली आहे. परंतु या आमदारांमुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेना दुबळी झालेली नाही. आगामी काळातही शिवसेना पक्ष जोमाने वाढेल. गुलाबरावच काय पण त्यांच्यापेक्षा चांगले उमेदवार देऊ आणि निवडून सुद्धा आणू, असा निर्धार रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील विविध मतदारसंघात संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी रविवारी (26 जून) बैठका घेतल्या. या बैठकांद्वारे आगामी काळातील पक्षाची ध्येयधोरणे आणि वाटचाल कशी असेल याबाबत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातही पाच आमदारांनी बंडखोरी केली असून या आमदारांमुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेना दुबळी झालेली नाही. आगामी काळातही शिवसेना पक्ष जोमाने वाढेल. बंडखोरांचा निषेध व्यक्त करु नका. मात्र ते अंगावर येत असतील तर त्यांना शिंगावर घ्या, अशा सूचनाही रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पालकर यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. जे पक्षासाठी काम करतील त्यांना पदं दिली जातील, अशीही सक्त ताकीद बैठकांमध्ये दिली असल्याचे संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी सांगितले.
जळगावातील 'या' पाच आमदारांची बंडखोरी
जळगाव जिल्ह्यात पाच आमदारांनी बंड केलं आहे. यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह लता सोनवणे, चिमणराव पाटील, किशोर पाटील आणि चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. हे पाचही आमदार एकनाथ शिंदे यांसोबत गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लू इथे मुक्कामाला आहेत.
आमदारांना सीआरपीएफचं संरक्षण
आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांचे पुतळे जाळत आहेत, घोषणाबाजी केल्या जात आहेत. धरणगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. सर्व बंडखोर आमदारांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याची पत्र शनिवारीच (25 जून) केंद्र सरकारला देण्यात आले होते. त्यानुसार रविवारी (26 जून) जळगावात सीआरपीएफचे पथक दाखल झाले. पथकासह स्थानिक पोलिसांचाही बंदोबस्त देण्यात आला आहे.