शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदार काळाच्या पडद्याआड, अमळनेरचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांचं निधन
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील माजी आमदार गुलाबराव पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर येथील माजी आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (23 ऑगस्ट) दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अमळनेर तालुक्यातील दहीवद गावात अंत्यसंस्कार (Funeral) केले जाणार आहेत.
शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदार म्हणून ओळख
गुलाबराव पाटील हे सुरुवातीला लोकल बोर्डात निवडून आले होते. त्यानंतर 1978 ते पहिल्यांदा पुलोद सरकारच्या काळात अमळनेर मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते. तीन वेळा आमदार राहिलेल्या गुलाबराव पाटील यांच्यावर साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता हरपला : अजित पवार
माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्या निधनावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा, त्यासाठी विधानसभेत उठणारा बुलंद आवाज हरपला, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांच्या निधनानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा, त्यासाठी विधानसभेत उठणारा बुलंद आवाज हरपला आहे. राजकारणापलीकडे मैत्री जपणारं एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/QwbMWtFoky
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 23, 2023























