जळगाव : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात वाळू तस्करांकडून तलाठ्याला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात मंडळ अधिकाऱ्यास धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाळूचा ट्रॅक्टर (Illegel Sand) ताब्यात घेतल्यानंतर महिला अधिकारी ट्रॅक्टरवर असताना थेट ट्रॅक्टरवरून संशयितांनी त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. 


गेल्या काही वर्षात वाळू माफियांचा चांगलाच हैदोस पाहायला मिळत आहे. एकीकडे सरकारने वाळू धोरण आणले असले तरीही असे प्रकार उघडकीस येत असल्याने वाळू तस्करी (Sand Smuggling) नित्याची झाल्याचे चित्र आहे. मात्र अनेकदा काही धडाकेबाज अधिकारी अशा वाळू तस्करांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अशावेळी तस्करांकडून मारहाणीचे प्रकार घडत असल्याचे देखील वारंवार निदर्शनास आले आहे. अशातच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडण्याच्या रागातून यावल (Jalgaon) तालुक्यातील महिला मंडळ अधिकाऱ्यास थेट ट्रॅक्टरवरून खाली फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 


जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात वढोडा शिर्साड रोडवर सायंकाळच्या सुमारास अवैध गौण खनिज वाहतूक करत असतानाचे ट्रॅक्टर यावल येथील मंडळ अधिकारी बबिता चौधरी (Babita Chaudhari) यांना आढळून आले होते. त्यांनी त्याचा पाठलाग करत, चालकाकडून चावी हस्तगत करत, त्या ट्रॅक्टरवर जाऊन बसल्या होत्या. यावेळी ट्रॅक्टर चालक त्यांना कारवाई करू नका, अस सांगत होता. मात्र कारवाई करण्यावर त्या ठाम असल्याचं लक्षात आल्यावर चालकाने त्यांना थेट ट्रॅक्टरवरून खाली फेकून देत पलायन केले आहे. या घटनेनंतर यावल पोलिसात रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात विनयभंगासह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत बबिता चौधरी जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून रेती माफिया विरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या बबिता चौधरी यांना महसूल विभगाच्यातर्फे उत्कृष्ट मंडळ अधिकारी म्हणून सन्मान करण्यात आला होता.


वाळू तस्करांकडून तलाठ्यास मारहाण  


श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदीतून वाळू चोरून वाहतूक सुरू असल्याची खबर मिळाल्यानंतर तलाठी व शिरामपूरचे महसूल पथक नदीपात्राकडे गेले पथक दाखल झाले. त्यावेळी डंपरमध्ये वाळू भरली जात होती. पथकाला पाहताच तस्करांच्या टोळक्याने पथकातील कर्मचाऱ्यांना तलाठ्याला मारहाण सुरू केली. या मारहाणीमध्ये तलाठी शिवाजी दरेकर हे जखमी झाले तर वाळू भरणारा पकडलेला डंपरही तस्करांनी पळून नेला. या घटनेच्या निषेधार्थ तसेच तस्करांना अटक करण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर प्रांत आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.


इतर महत्वाची बातमी : 


वाळू माफिया बेलगाम, बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करताना तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न