श्रीगोंदा (अहमदनगर) : अहमदनगरमधील श्रीगोंद्यात पुणे जिल्ह्यातील वाळू तस्करांनी हैदोस घातला आहे. वाळू तस्करीसाठी माफियांनी भीमा नदीतील बंधाराच फोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गार, कौठा भागातील या बंधाऱ्यानं परिसरातील गावांना फायदा होतो. मात्र, बंधार्‍याच्या खालील भागात पाण्याअभावी बोटीतून वाळू उपसा करता येत नव्हता. त्यामुळे तस्करांनी हातोडे, पहारीनं फळ्या काढून बंधारा फोडण्याचा प्रयत्न केला.

परिसरातील नागरिकांनी विरोध केल्यानं वाळू तस्करांचा डाव फसला. बंधार्‍यावरुन नागरिक आणि तस्करांत शाब्दिक चकमक झाली.

काही दिवसांपूर्वीच तस्करांनी शाळकरी मुलांची बोटही फोडली होती. वाळू तस्करांपुढं महसूल विभाग, पोलीसांनी दुर्लक्ष केल्यानं नागरीक हतबल झाल्याचं दिसतं आहे.