जळगाव : लोकसभा (Loksabha), विधानसभा Vidhansabha) या निवडणुका यापूर्वी या देशात 31 वर्ष एकत्र पार पडत होत्या. 'वन नेशन, वन इलेक्शन' आता पंतप्रधान (PM Narendra Modi) यांची इच्छा दिसते. जेवढ्या दिवस निवडणुका लांबतील, तेवढं नव्याने गठीत झालेली इंडिया मजबूत होईल आणि याचा फटका भाजपाला बसेल, म्हणून हा मध्यममार्ग काढला असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे तर काही होऊ शकतं असा टोलाही खडसे यांनी लगावला आहे.
देशात एक देश एक निवडणूक (One Nation One Election) होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. यासाठी केंद्र सरकारकडून एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अहवालानंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात येत असून भाजपाला आपला पराभव दिसत असल्याने असा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, लवकर निवडणुका घेण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो आहे. जेवढ्या दिवस निवडणुका लांबतील, तेवढं नव्याने गठीत झालेली इंडिया मजबूत होईल आणि याचा फटका भाजपाला बसेल, म्हणून हा मध्यममार्ग काढला असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक देश एक निवडणुकीची इच्छा दिसत असून भाजपचा पराभव देखील दिसत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे म्हणाले की, लोकसभा, विधानसभा या निवडणुका यापूर्वी या देशात 31 वर्ष एकत्र पार पडत होत्या. 'वन नेशन, वन इलेक्शन' आता पंतप्रधान यांची इच्छा दिसते. त्यामुळे एक नवीन अधिवेशन घेण्याचं त्यांनी ठरवलेल दिसतंय. वन नेशन, वन इलेक्शन हे करत असताना बाकीच्या राज्यांना बरखास्त करावे लागेल, काहींना मुदतवाढ द्यावी लागेल, असेही खडसे म्हणाले. इंडियाच्या संयोजक (INDIA) निवड चर्चेवर खडसे म्हणाले की, जे काही इंडियाच्या बैठकीत निर्णय होतील, ते सामूहिक निर्णय होतील. शरद पवार (Sharad Pawar), राहुल गांधी व अन्य कोणाचे नाव येतील, ते मान्य सर्वांना राहील. तर सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले कि, लोकसभा, विधानसभा जसा जसा निवडणुका येऊ घातल्या आहेत. तसे तसे भाव कमी केले जात असून नुकतंच इंधन दर कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. मात्र अनेक दिवसांपासून तेल, तूर, डाळ, गॅस सर्वत्र भाव वाढून मध्यमवर्गांची लूट यांनी केली. यात सामान्य नागरिक होरपळून निघाला असताना आता हळहळू निवडणूका येत असल्याने असे निर्णय घेत आहेत. तेल व गॅस इतर वस्तूचे भाव कमी करून निवडणुकीचा इस्सू करण्याचा हा प्रयत्न असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
'वन नेशन, वन इलेक्शन' ही आवश्यक बाब : अजित पवार
'वन नेशन, वन इलेक्शन' ही आवश्यक बाब होती. ती भूमिका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी मांडली होती. तिला मूर्त स्वरूप देण्याची वेळ आता आली आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. विकासकामांवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल. यापूर्वी 'वन नेशन, वन टॅक्स' हा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्व राज्यांच्या सहमतीने अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला. त्याच धर्तीवर 'वन नेशन, वन इलेक्शन' ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.