तिसरीही मुलगीच झाल्यानं संतापलेल्या बापाकडून आठ दिवसांच्या चिमुकलीची हत्या, आजारानं बाळ दगावल्याचा रचला बनाव, प्रकरण नेमकं काय?
Jalgaon Crime: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हरिनगर तांडा येथे ही घटना घडली. हत्या करणाऱ्या पित्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
Jalgaon Crime News: 'बेटी बचाव बेटी पढाव'चा नारा शासन स्तरावर केला जात असताना, जन्मदात्या बापाकडूनसुद्धा मुली सुरक्षित नाही, याचा प्रत्यय जळगावमध्ये समोर आला आहे. तीन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगीच झाल्यानं संतप्त झालेल्या जन्मदात्या पित्यानं आपल्या आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केल्याचा धक्कदायक प्रकार जळगावात (Jalgaon News) उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हरिनगर तांडा येथे ही घटना घडली. हत्या करणाऱ्या पित्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाकोद येथील हरिनगर तांडा येथे राहत असलेल्या गोकुळ गोटिराम जाधव या इसमास अगोदर दोन मुली होत्या, त्यानंतर तिसरं अपत्य देखील मुलगीच झाल्यानं गोकुळ गोटीराम जाधव याचा संताप अनावर होऊन त्यानं आपल्या आठ दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात तंबाखू कोंबली आणि तिला तसंच पाळण्याच झोपवलं.
तंबाखूच्या विषानं आठ दिवसांच्या या चिमुकलीनं काही वेळातच प्राण सोडला. सकाळी नराधम बापानं चिमुकली आजारी असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला. आरोपी पित्यानं जवळच्याच परिसरात पोटच्या चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले. या सर्व प्रकाराची माहिती त्या परिसरातील आशा सेविकांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठांना यासंदर्भात माहिती दिली होती. वरिष्ठांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण प्रकार कानावर घातला, तसेच, अनेक शंकाही उपस्थित केल्या. पोलिसांनी सर्व प्रकरण जाणून घेऊन तात्काळ आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली. सदर प्रकरणाचा पोलिसांनी गोपनिय तपास सुरू केला. आरोपी गोटीराम जाधव यानंच हा खुनाचा धक्कादायक प्रकार केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं, पोलिसांनी त्यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. तसेच, पोलिसांनी तात्काळ नराधम बापाला अटक केली. संपूर्ण जिल्ह्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला. तसेच, संपूर्ण जिल्हात खळबळ पसरली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :