जळगावात बस-कंटेनरच्या अपघात; आ. चंद्रकांत पाटलांची समयसूचकता, जखमींना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात पोहोचवलं
आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्व जखमी रुग्णांना स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवलं आणि त्यांना योग्य ते उपचार मिळतील याकडे लक्ष दिलं.
जळगाव : मुंबई नागपूर महामार्गावर समोर चालणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक लावल्याने मागे चालणारी बस ही कंटेनरवर आदळल्याची घटना मंगळवारी, 15 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या घटनेत काही महिला तसेच पुरूष प्रवासी हे जखमी झाले आहेत. दरम्यान याठिकाणाहून जात असलेल्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी उतरुन, बसमधील जखमींना स्वत:च्या वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
एम.एच. 14 बी टी 3998 या क्रमाकांची जळगाव मुक्ताईनगर ही बस मंगळवारी महामार्गावरुन जात असताना गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ समोर चालत असलेल्या कंटनेरने अचानक ब्रेक लावला. याचा अंदाज कंटेनरच्या मागे येत असलेल्या बसचालकाला आला नाही आणि ही बस कंटेनरवर जावून धडकली. यात बसमधील प्रवाशांना तोंडाला तसेच इतर ठिकाणी मार लागला, तर काहींचे डोके बसच्या सीटच्या लोखंडी रॉडवर आदळून डोक्याला दुखापत होवून ते जखमी झाले.
त्याचवेळी या ठिकाणाहून जळगाव येथे कामानिमित्ताने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांच्या वाहनाने जात होते. अपघात झाल्याचे दिसल्यावर आमदार चंद्रकांत पाटील हे तात्काळ त्यांच्या वाहनातून खाली उतरले आणि बसमध्ये चढले, जखमींवर वेळेत उपचार व्हावेत म्हणून कुठल्याही वेळेचा विलंब न करता आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्याच्या चालकाला सूचना देत त्यांच्या गाडीत बसवून जखमींना जिल्हा रुग्णालय जळगाव येथे पाठवले. उर्वरित जखमींना देखील तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन रुग्णालयात हलवले. बसमधील शेवटचा जखमी प्रवाशी हॉस्पिटलमध्ये पोहचेपर्यंत आमदार चंद्रकांत पाटील यांनी पूर्ण वेळ घटनास्थळी थांबून होते.
एवढ्यानंतर न थांबता, आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष जिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन जखमींची भेट घेत, त्यांच्यावरील होत असलेल्या उपचाराबाबत माहिती घेतली. तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वेळेत आणि योग्य त्या उपचाराबाबत सूचना केल्या. तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावून घेत, त्यांच्याकडून तात्काळ जखमींच्या पुढील उपचारासाठी मदत जाहीर करून घेतली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे पहायला मिळत असून त्यांचा जखमींना मदत करतानाचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ही बातमी वाचा: