Jalgaon Accident : पाचोऱ्यात भरधाव वाहनाने चौघांना उडवलं; दोघांचे पाय निकामी, दोन जण जखमी
Jalgaon Accident : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात भीषण अपघात झाला. भरधाव पिकअपने रस्त्यालगत बसलेल्या चौघांना उडवलं. याच दोघांचे पाय निकामी झाले तर दोन जण किरकोळ जखमी झाले.
Jalgaon Accident : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा शहरात भीषण अपघात (Accident) झाला. भरधाव पिकअपने रस्त्यालगत बसलेल्या चौघांना उडवलं. याच दोघांचे पाय निकामी झाले तर दोन जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
चालकाचा भरधाव पिकअप वाहनावरील ताबा सुटला आणि वाहनाने रस्त्यालगत मंदिरासमोर बसलेल्या चौघांना उडवलं. आज (12 मे) पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकातील दत्तमंदिरासमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांपैकी दोन जणांचे गुडघ्यापासून पाय निकामी झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
दोघांचे पाय गुडघ्यापासून निकामी
जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वसंत भाईदास पाटील (वय 42 वर्षे रा. सुरत), विनोद पाटील (वय 50 वर्षे रा. पाचोरा), अमोल वाघ (वय 27 रा. पाचोरा) आणि कुंदन परदेशी (वय 17 वर्षे रा. पुनगाव ता. पाचोरा) अशी जखमींची नावं आहेत. यात वंसत पाटील आणि विनोद पाटील यांचे गुडघ्यापासून दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
कसा झाला अपघात?
भडगावकडून बुलढाण्याकडे एम एच बी एम 7943 या क्रमाकांचे पिकअप वाहन जात होतं. यादरम्यान वाहन पाचोरा शहरातून जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव वाहनाने रस्त्यालगत असलेल्या दत्त मंदिरासमोर बसलेल्या वसंत भाईदास पाटील, विनोद पाटील, अमोल वाघ आणि कुंदन परदेशी या चार जणांना धडक दिली. धडक एवढी जोरदार होती, या धडकेनंतर वसंत पाटील आणि विनोद पाटील या दोघांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून निकामी झाले. तर अमोल वाघ आणि कुंदन परदेशी या दोन जणांना किरकोळ दुखापत झाली. वाहनावरील चालक आणि क्लिनर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सावदा-वाघोदा रस्त्यावर बर्निंग ट्रकचा थरार
जळगावच्या सावदा वाघोदा रस्त्यावर बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. रावेरच्या वाघोदा रस्त्यावर बऱ्हाणपूरला जाणाऱ्या आयशर ट्रकला मध्यरात्री अचानक आग लागली. वाढत्या तापमानामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. वाघोदा इथले ग्रामस्थ आणि सावदा इथल्या अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आली.
हेही वाचा
बोरघाट उतरताना ब्रेक फेल, चालकाचा ताबा सुटला अन् ट्रक पलटला; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात