Gulabrao Patil : एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
Gulabrao Patil : जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 1350 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी भाषणात तुफान फटकेबाजी केली.
जळगाव : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana), महिलांना एसटी भाड्यात 50 टक्के सवलत दिली. मोठ्या आनंदात महिला भगिनी आता बसने प्रवास करतात. हे एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलं, ते बी दाढीवाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) बी दाढीवाले आणि गुलाबराव बी दाढीवाले. लाईन लगी है सब... अशी तुफान फटकेबाजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulbarao Patil) यांनी केली आहे. जळगावच्या (Jalgaon News) धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तब्बल 1 हजार 350 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, सायकलीची मला पण लहानपणी आवड होती. एकदा भाड्याने सायकल घेतली. तेव्हा 50 पैसे अर्ध्या तासाच भाडं होतं. मात्र, मी एक तास सायकल फिरवली आणि 25 पैसे दिले. त्यामुळे सायकलवाल्याने माझ्या वडिलांना तक्रार केली व माझ्या वडिलांनी मला खूप बदडलं. तो मार खाणारा गुलाबराव पाटील आज बहिणींना सायकल वाटप करतो हीच मोठी आनंदाची बाब आहे.
गुलाबराव देवकरांवर हल्लाबोल
बरेच राजकारणी लोक माझ्यावर टीका करतात आणि मी सायकल देतो तुम्ही टायर तर देऊन बघा. तुम्हाला करता आलं नाही. तुम्हाला फक्त मजूर फेडरेशनच कमिशन घेता येतं. बाकी दुसरं काही करता येत नाही. कमिशनमधून थोडं वाट ना बाबा. दोन हजारांची पावती फाडतो आणि चार वेळेस मोबाईल आणि व्हाट्सअपवर टाकतो. या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे राजकीय विरोधक गुलाबराव देवकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
हात जोडून मुलींकडे लक्ष देण्याची विनंती
गुलाबराव पाटलांनी गरिबी पाहिलेली आहे. चटणीवर पाणी खाणारा हा गुलाबराव पाटील आहे. प्रारब्धात असेल तर सगळं काही मिळेल. नशिबात असेल तर छप्पर फाडके देगा. त्याला कोणाला सांगायची गरज नाही. माझी मुलगी माझी खूप काळजी घेते. ज्यांना मुलगी नाही त्यांना विचारा मुलगी काय असते. माणसाला मुलगी पाहिजे. मुलगी ही आईचं रूप आहे. मुलगी ही बहिणीचे रूप आहे. मुलगी ही देवीचं रूप आहे. पण तुमचे नराधम जे काम करतायहेत ना ते अत्यंत चुकीचं काम करत आहेत. त्यामुळे घरातल्या मुलाकडे दुर्लक्ष झाले तर चालेल पण मुलीकडे लक्ष द्या, तिच्याकडे दर्लक्ष होऊ देऊ नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे. या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्याचाराच्या वाढता घटना लक्षात घेता उपस्थितांना हात जोडून मुलींकडे लक्ष देण्याची विनंती केली.
एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...
आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महिला मुलींसाठी खूप काही केला आहे. हे सरकार सुद्धा मुली आणि महिलांच्या पाठीशी उभं आहे. लाडकी बहीण योजना, महिलांना एसटी भाड्यात 50 टक्के सवलत दिली. मोठ्या आनंदात महिला भगिनी आता बसने प्रवास करतात. हे एकनाथ शिंदेंनी केलं, ते बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले आणि गुलाबराव बी दाढीवाले. लाईन लगी है सब... देशातले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की, ज्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय एकनाथ शिंदे दाढीवाल्याने घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार नाही
लाडकी बहीण योजना सुरू केली. पैसे मिळणार नाही असं सांगितलं जात होतं. मात्र, पैसे मिळाले आता म्हणतात निवडणुकीनंतर योजना बंद होईल. अडीच वर्षे त्यांनी काय केलं नाही. मीच काय माझ्यापेक्षा ज्येष्ठ राजकारणी आहेत त्यांना पण विचारा. असा कोणता मुख्यमंत्री आहे की, तो १३ वेळेस एका जिल्ह्यामध्ये येतो. मात्र, जळगाव जिल्ह्यामध्ये आले त्याचं नाव एकनाथराव शिंदे आहे. देण्याची दानत माझ्या नेत्यांमध्ये आहे आणि हेच गुण आमच्या मध्ये आहे. जसं पाण्याचा उगम होतो आणि ते वाहत राहतं त्या पद्धतीने एकनाथराव शिंदे आमचा स्त्रोत आहे आणि त्या ठिकाणाहून आमचा उगम झाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. महिलांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार नाही. कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं तर दीड हजाराचे तीन हजार रुपये करण्याची ताकद आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवली आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा