जळगावमधील ग. स. सोसायटीच्या सर्व साधारण सभेत राडा, राष्ट्रगीत सुरू होताच दोन्हीकडून शांतता
jalgaon news update : जळगावच्या ग. स. सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मोठा राडा झालाय. व्यासपीठावर संचालक मंडळ आणि उपस्थित शिक्षकांमध्ये अरेरावी तसेच धक्काबुक्की झाली.
जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी म्हणजेच ग. स सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा झालाय. सभेत बोलू न दिल्याच्या मुद्द्यावरून सहकार आणि लोक सहकार गट आमने-सामने आल्यामुळं हा राडा झाला. सहकार गट आणि लोक सहकार गटाकडून एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप करण्यात आले.
उद्या शिक्षक दिन आहे. या शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांचा सन्मान केला जातो. गुरु म्हणून या शिक्षकांना आदराचे स्थान आहे. एकीकडे असं चित्र असताना दुसरीकडे जळगाव शहरात शिक्षक सभासद असलेल्या ग. स. सोसायटीच्या वार्षिक सर्व साधारण सभेत काही शिक्षकांचं बेशिस्त वर्तन पाहायला मिळालं.
जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर आशिया खंडात सर्वात मोठी समजली जाणारी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग. स. सोसायटी. याच सोसायटीची सभा आज नूतन मराठा महाविद्यालयात पार पडली. यावेळी संचालक मंडळाने घेतलेला निर्णय मान्य नसल्याने तसेच बोलू दिले जात नसल्याने विरुद्ध गटातील सदस्य व सत्ताधारी आमने-सामने आले. यावेळी विरोधी गटाचे सदस्य व्यासपीठावर चढल्याने प्रचंड गदारोळ झाला.
व्यासपीठावर संचालक मंडळ आणि उपस्थित शिक्षकांमध्ये अरेरावी तसेच धक्काबुक्की झाली. गोंधळातच सभा पार पडण्याची अनेक वर्षांची परंपरा आजही कायम असल्याचे यावेळी पाहायला मिळालं.
गोंधळात विषय मंजूर
ग. स. सोसायटीची 113 वी वार्षिक सभा आज पार पडली. निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नवनियुक्त संचालक मंडळाची ही पहिलीच सभा होती. यावेळी सभेत संचालक मंडळ व्यासपीठावर विषय मांडत असताना उपस्थित केलेला विषय मंजूर नसल्याचे सांगत उपस्थितांपैकी सदस्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्याने प्रचंड गोधळ उडाला. यावेळी गोंधळाचा फायदा उचलून सहकार गटाच्या संचालक मंडळाकडून सर्व विषय या सभेत मंजूर करण्यात आले .
राष्ट्रगीत सुरू होताच थांबला गोंधळ
सभेत गोंधळ वाढत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असताना राष्ट्रगीत लावण्यात आले. राष्ट्रगीत लावल्यानंतर एका क्षणांत गोंधळ थांबला.
लोक सहकार गटाच्या मनात राग आहे. मात्र, ते प्रत्यक्षात विरोध दर्शविण्यासाठी कुठलाही मुद्दा नसल्याने त्यांनी अशा पद्धतीने शिक्षक सभासदांच्या माध्यमातून गोंधळ निर्माण केल्याचा आरोप सत्ताधारी सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील यांनी केला आहे.
सहकार गटाकडून करण्यात येत असलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे. लोकशाही पद्धतीत बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र म्हणणे मांडून घेता या सभेमध्ये विषय मंजूर करण्यात आले. त्यामुळे गोंधळ उडाला. तर दुसरीकडे कायदेशीर बाबींचही या ठिकाणी पालन करण्यात आलेलं नाही, असा आरोप लोकसकार गटाचे पदाधिकारी व माजी ग. स सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील यांनी केलाय.