Iran On India And Pakistan: दक्षिण आशियातील भारताचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणाऱ्या इराणचं पाकिस्तानमधून मोठं विधान; परराष्ट्रमंत्री म्हणाले...
Iran On India And Pakistan: इराणनेही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.

Iran On India And Pakistan: संयुक्त राष्ट्र महासचिवांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना लष्करी संघर्ष टाळण्याचा सल्ला दिला आहे. युद्ध हा पर्याय असूच शकत नाही. पहलगाम हल्ल्यााचा तीव्र शब्दात निषेध करतो, मात्र दोन्ही देशांनी युद्धाचा विचारही करू नये असं महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलंय. नागरिकांना लक्ष्य करणं चूक आहे. पहलगाम हल्ल्यातील दोषींना जरूर शिक्षा मिळावी, पण देशांनी लष्करी संघर्ष टाळावा असं गुटेरेस यांनी म्हटलं. तर इराणने भारत आणि पाकिस्तानला संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.
दक्षिण आशियाचा सच्चा मित्र म्हणून इराणची ओळख आहे. इराणनेही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेतून तोडगा काढावा, असं आवाहन इराणने केलंय. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची हे पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी हे आवाहन केलं. गुरूवारी (8 मे) अराघची हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. तिथे ते भारतीय नेतृत्वाशीही शांततेबाबत चर्चा करतील.
रशियाचा भारताला, तर चीनचा पाकिस्तानला पाठिंबा-
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर जगातला कोणता देश कुणाच्या बाजूनं असेल याची चर्चा सुरू झालीय. भारताचा जुना मित्र असलेला रशिया भारताच्या बाजूनं धावून आलाय. तर चीनने आपला खरा रंग दाखवत पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात रशिया भारतासबोत असल्याची ग्वाही, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली. पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून बातचीत केली. आणि पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या हल्ल्यातल्या दोषींना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना शिक्षा मिळायलाच हवी, यावर पुतीन यांनी जोर दिला. तर दुसरीकडे भारत- पाकिस्तानच्या तणावादरम्यान चीननं मोठं विधान केलंय. स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊ, असं चीननं जाहीर केलंय. पाकिस्तानचे राष्ट्रपती असिफ अली झरदारी यांनी इस्लामाबादमध्ये चीनच्या राजदूतांची भेट घेतली. त्यावेळी चीनंन ही ग्वाही दिली.
नवी दिल्लीत घडामोडी, बैठकांना वेग-
संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत घडामोडी, बैठकांना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उच्चस्तरीय बैठका सातत्याने सुरूच आहेत. पंतप्रधानांनी काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव, ताणलेले भारत पाकिस्तान संबंध, भारताची तयारी याचा आढावा घेतला. याआधी त्यांनी वायुदलप्रमुख, नौैदलप्रमुखांशी चर्चा केली होती. एनएसए अजित डोवालांशी चर्चा झाल्यावर त्यांनी तातडीने केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्याशीही चर्चा केली.
























