नवी दिल्ली : भारताला अरबी समुद्र, लक्षद्वीप समुद्र, अंदमान समुद्र आणि बंगालचा उपसागर असा विस्तृत समुद्र लाभला आहे. त्याच्या डीप सी अर्थात खोल समुद्रात 4,371 वेगवेगळ्या जलचर प्रजाती असल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये 1,032 प्रजाती या किंगडम प्रोटस्टा आणि 3,339 प्रजाती या किंगडम अॅनिमलिया या प्रकारातील आहेत. झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने संबंधित माहिती प्रकाशित केली आहे. भारतीय समुद्रांतील डीप सी वर अशा प्रकारचा हा पहिलाच विस्तृत अभ्यास आहे. 


केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयांने 'डीप सी फॉनल डायव्हरसिटी इन इंडिया' या नावान एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये 41 हून जास्त भाग असून पाच संशोधकांनी आपल्या संशोधनाच्या आधारे याचं लिखान केलं आहे. 


भारताच्या आजूबाजूला अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि लक्षद्वीप समुद्र लाभला आहे. या 4,371 प्रजातींपैकी सर्वाधिक म्हणजे 2,766 प्रजाती या अरबी समुद्रात सापडल्या आहेत. त्यानंतर 1,964 प्रजाती या बंगालच्या उपसागरात सापडल्या आहेत. 1,396 प्रजाती या अंदमानच्या समुद्रात सापडल्या असून सर्वात कमी म्हणजे 253 प्रजाती या लक्षद्वीपच्या समुद्रात सापडल्या आहेत.


काय असतं डीप सी अर्थात खोल समुद्र? 
समुद्राच्या सपाटीपासून खोलपर्यंत वेगवेगळे स्तर असतात. त्यामध्ये सूर्याचा प्रकाश ज्या भागापर्यंत जाऊ शकतो त्या भागापर्यंत जलचर जगू शकतात असं समजलं जातं. म्हणजे सूर्याच्या प्रकाश संश्लेषनाच्या प्रक्रियेमुळे समुद्रातील वनस्पती, ज्यामध्ये कोरल रिफस्, वेगवेगळ्या शेवाळांचा आणि इतरही प्रकारच्या वनस्पतींचा समावेश असतो, त्या वाढतात. त्या वनस्पतींचा अन्न म्हणून वापर अनेक प्राथमिक उत्पादकांकडून केला जातो. पण सूर्याच्या प्रकाशाला समुद्राच्या तळापर्यंत पोहचता येत नाही. समुद्राच्या 200 मीटर खोलीनंतर सूर्याचा प्रकाश पोहचत नाही. अशा भागाला डीप सी म्हणतात. या भागात प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत नसल्याने समुद्रातील अन्न साखळीतील प्रथम स्तरातील उत्पादकांना डीप सीमध्ये जगता येणं शक्य होत नाही. 


भारतात 1874 पासून डीप सी संशोधनाला सुरुवात
जगात डीप सी भागात सुरुवातीचे संशोधन ज्या काही मोजक्या देशांकडून करण्यात आलं आहे, त्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे असं या पुस्तकात सांगण्यात आलंय. भारताकडून  RIMS (Royal Indian Marine Survey) या जहाजाच्या माध्यमातून 1874 साली पहिल्यांदा डीप सीमध्ये संशोधनाला सुरुवात झाली. RIMS च्या माध्यमातून 1926 पर्यंत हे संशोधन सुरु होतं. त्यानंतरच्या काळात झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यामातून आणि भारतीय नौदलाच्या मदतीने या डीप सी मध्ये संशोधनाला सुरुवात झाली. त्यामध्ये वेगवेगळ्या भागाचा शोध लावणे, त्या भागातील नव्या वनस्पती आणि जलचरांची माहिती गोळा करणे तसेच इतरही माहिती गोळा करण्याचं काम सुरु झालं. या भागात युनिसेल्युलर युकॅरिऑट्स, स्पॉन्जेस, कोरल्स, इकायनोडर्मस् आणि मासे तसेच सस्तन प्राण्याची मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करण्यात आली. 


झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे माजी संचालक कैलास चंद्रा हे म्हणतात की, समुद्रातील डीप सी हा जो भाग आहे तो आतापर्यंतच्या संशोधनातील सर्वाधिक कमी प्रकाश टाकण्यात आलेला भाग आहे. या भागात संशोधन करायला प्रचंड वाव आहे. यामध्ये कोरल रिफ्स, हायड्रोथर्मल व्हेन्ट्स, सबमरिन कॅनियन्स, डीप सी ट्रेन्चेस, समुद्री पर्वत, कोल्ड सीप्स आणि मड व्होल्कॅनो या भागांचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी संधी आहे. सध्या जे प्रकाशन करण्यात आलं आहे ती माहिती ही एक प्राथमिक स्वरुपाची माहिती म्हणता येईल. त्याच्या आधारे डीप सीचे व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल या ज्ञानात भर पडेलच पण या भागाचा शाश्वत विकास कशाप्रकारे करता येईल याचीही दिशी मिळेल असंही कैलास चंद्रा यांनी सांगितलं. 


सस्तन प्राण्यांच्या 31 प्रजाती
भारताच्या आजूबाजूच्या समुद्रातील डीप सीमध्ये 31 प्रकारच्या सस्तन प्राण्यांच्या प्रजाती सापडल्या आहेत. त्यामध्ये 'क्रिटिकली एन्डेन्जर्ड' म्हणजे ज्या प्रजाती नष्ट होण्याच्या अत्यंत धोक्याच्या पातळीवर आहेत अशा इरावती डॉल्फिनचा समावेश आहे. तसेच इन्डो-फाईनलेस पॉरपॉइज आणि स्पर्म व्हेल जे नष्ट होण्याच्या 'संवेदनशील' गटात मोडत आहेत, त्यांचाही समावेश आहे. 


या सस्तन प्राण्याच्या गटात कर्व्हिअर बेक्ड व्हेल आणि शॉर्ट बेक्ड कॉमन डॉल्फिन, जे समुद्राच्या 8000 मीटरपेक्षा खाली राहतात, या प्रजातींचा समावेशही आहे. 


समुद्री कासव
जगात समुद्री कासवाच्या सात प्रकारच्या प्रजाती सापडतात. भारतीय समुद्रात त्यापैकी पाच प्रजाती उपलब्ध आहेत. समुद्री कासवांच्या प्रजनानासाठी सर्वाधिक चांगल्या अधिवासापैकी भारत हा एक आहे. खासकरुन, ऑलिव्ह रिडले आणि लेदरबॅक कासवांच्या प्रजननासाठी भारताच्या समुद्रात एक चागलं वातावरण आहे. 


इतर प्रजाती 
भारतीय डीप सीमध्ये इतरही काही प्रजाती सापडल्या आहेत. त्यामध्ये स्पॉन्जेसच्या 36, हार्ड कोरल्सच्या 30, ऑक्टोकोरल्सच्या 92, हायड्रोझोन्सच्या 124, सात प्रकारचे जेलीफिश आणि सात प्रकारचे कोन्ब जेली सापडतात. तसेच 150 प्रकारचे मोलुस्कस त्यामध्ये 54 सेफलोपॉड्स, 134 प्रॉन्स, 23 प्रकारचे लॉबस्टर्स, इकायनोडर्मच्या 230 प्रजाती, टुनिकेट्सच्या 53 प्रजाती, 443 प्रकारचे मासे आणि 18 प्रकारचे साप सापडतात. 


भारताच्या डीप सी मिशनसाठी 2021-22 च्या अर्थसंकल्पात 4000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंतचे संशोधन हे 2000 मीटर खोलीपर्यंत मोठ्या प्रमाणात करण्यात आलं असून भारतीय समुद्राची खोली ही 6000 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या पुढे डीप सी मध्ये संशोधन करण्यात मोठा वाव आहे.  


(संदर्भ- द हिंदू, झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया)


महत्वाच्या बातम्या :