मुंबई : मागील काही दिवसांमध्ये वन्य प्राणी आणि मानवामधील संघर्षाच्या घटना वाढल्याचं दिसून आलं होतं. मानवी वस्त्यांमध्ये नव्य प्राण्यांचा वावरही चिंतेत टाकणारी बाब. याच मुद्द्यावर आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष टाकलं आहे. 


सध्या महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून आताच्या घडीला राज्यात  312 वाघ आहेत. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे. त्यातच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने लगतच्या दोन गावांचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत वनविभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. 


Mumbai Vaccination : स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर येऊन घेता येईल कोविड प्रतिबंधक लस; मुंबई महापालिकेकडून गाईडलाइन्स जारी


गावांचे आवश्यकतेनुसार पुनर्वसन 


राज्यातील वाघांची संख्या आणखी वाढणार हे गृहीत धरून आतापासूनच त्यावर मार्ग काढणे,उपाय योजना करणे गरजेचे आहे तरच पुढील काळात आपण हा संघर्ष टाळू शकतो.त्यासाठी व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्यांच्या जवळच्या गावांचे आवश्यकतेनुसार पुनर्वसन करण्यात यावे आणि या दरम्यान गावकऱ्यांना रोखीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.


पर्यटनाचा विकास करावा


पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशीच ठिकाणी निवडून त्यामध्ये जाणिवपूर्वक नैसर्गिक संसाधनं वाढतील आणि प्रेक्षणीय दिसतील अशा स्थळांचा विकास करावा तसेच तेथे जंगलाचा अनुभव आला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना करा


उघड्या विहिरीत वाघ तसेच अन्य प्राणी पडून त्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना अलीकडील काळात घडल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी त्या भागातील विहिरींना संरक्षण भिंत बांधण्यासोबतच अन्य उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.