नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचं थैमान अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीय. देशात कोरोनाची आकडेवारी हळूहळू कमी होत असली तरी यावर पूर्णपणे अटकाव यायला वेळ लागणार आहे. कोरोना रुग्णांच्या रोजच्या संख्येपेक्षा डिस्चार्ज होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त येत आहे. ही बातमी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी महत्वाची आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची दीर्घ काळ काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत दिल्ली स्थित ऑल इंडिया ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. 


डॉ गुलेरिया यांनी सोमवारी सांगितले की कोरोनाव्हायरस आजाराने बरे झालेल्या आणि बरे होणार्‍या लोकांना दीर्घकाळापर्यंत वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल. गुलेरिया म्हणाले की असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कोरोनाव्हायरस आजारातून बरे झाल्यानंतरही अनेक लक्षणे जाणवत आहेत. त्यासाठी त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे.  जर अशी लक्षणं 4 ते12 आठवड्यांपर्यंत दिसून आली तर त्याला चालू लक्षणयुक्त कोविड   (ongoing symptomatic Covid) किंवा तीव्र  पोस्ट कोविड सिंड्रोम ( post-acute Covid syndrom) म्हणतात, असं त्यांनी सांगितलं. तर लक्षणं जर 12 आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिसल्यास त्याला पोस्ट-कोविड सिंड्रोम किंवा नॉन-कोविड असे म्हटलं जाऊ शकेल, असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं. 


डॉ गुलेरिया म्हणाले की, बरे झालेल्या सामान्य लक्षणांमध्ये रूग्णांना सामान्य फुफ्फुसाचे आजार, श्वास घेण्यास त्रास होणे, आठवडाभर खोकला, छातीत दुखणे अशी लक्षणं दिसतात. ते म्हणाले, ही कोविडनंतरची किंवा कोविडची लक्षणे शरीरातील कमी रोगप्रतिकारक शक्तीमुळे दिसून येतात. यामध्ये तीव्र थकवा येणे, सिंड्रोम, सांधेदुखी, डोकेदुखीच्या देखील तक्रारी येत आहेत. अशावेळी त्या त्या लक्षणांवरील उपचारांची आवश्यकता आहे, असं  गुलेरिया म्हणाले. सोबतच निद्रानाश आणि नैराश्याने ग्रस्त होणे अशी लक्षणे देखील आढळत आहेत, असं ते म्हणाले.  त्यांनी कोरोनामुक्त झालेल्या आणि अशा लक्षणांनी बाधित लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी पोस्ट कोविड सेंटर करणं गरजेचं असल्याचंही म्हटलंय.