स्वतःला PMO अधिकारी असल्याचे सांगून घेतली Z+ सुरक्षा, गुजरातच्या किरण पटेलचा कारनामा
PMO Fake Official: तोतया अधिकारी असल्याचे समोर आल्यानंतर किरण पटेलला 3 मार्च रोजी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली होती.
PMO Fake Official Arrested : जम्मू-काश्मीरमध्ये पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) उच्च अधिकारी म्हणून झेड प्लस सुरक्षेत फिरणाऱ्या किरण पटेल ( Kiran Bhai Patel ) याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पटेल याने आपण पंतप्रधान कार्यालयाचा उच्च अधिकारी असल्याचे सांगितल्याने त्याला झेड-प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्ही आणि जम्मू-काश्मीरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकृत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे पटेल याने जम्मू-काश्मीरमधील उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठका देखील घेतल्या आणि नियंत्रण रेषेजवळील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्याचे समोर आले आहे.
तोतया अधिकारी असल्याचे समोर आल्यानंतर किरण पटेलला 3 मार्च रोजी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्याने आपण केंद्रात 'अतिरिक्त सचिव' म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते.
PMO Fake Official: कोण आहे किरण पटेल?
किरण पटेल हा गुजरातचा रहिवासी आहे. त्याचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाइड आहे. त्याच्या ट्विटर प्रोफाइलनुसार, त्याने व्हर्जिनियामधील कॉमनवेल्थ विद्यापीठातून पीएचडी आणि आयआयएम त्रिचीमधून एमबीए केले आहे. आरोपीने ट्विटरवर स्वत:ला विचारवंत, रणनीतीकार असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्याने जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक मिळाल्याचे अनेक व्हिडीओ देखील पोस्ट केले आहेत.
श्रीनगरच्या निशात पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, किरण पटेल काश्मीर खोऱ्यातील अनेक भागात कारवायांमध्ये सहभागी होता. त्याने सरकारी आदरातिथ्य, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) आणि आलिशान हॉटेलमधील सेवा घेतली. पटेल याच्यावर 2 मार्च रोजी फसवणूक आणि बनावटीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली.
PMO Fake Official : अशा आवळल्या मुसक्या
2 मार्च रोजी पटेल तिसऱ्यांदा काश्मीरमध्ये आला होता. तो विमानतळावर उतरल्यानंतर सीआयडी अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. कारण कोणत्याही व्हीआयपी मुव्हमेंटची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आलीली नव्हती. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून बनावट ओळखपत्रे जप्त केली. पटेल याच्याकडून 10 बनावट व्हिजिटिंग कार्ड जप्त करण्यात आले असून दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या