Women Legal Age of Marriage : केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचं वय हे 18 वरुन 21 वर नेण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयावर समाजवादी पक्षाचे खासदार शफीफ उर रहमान वर्क यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुलींच्या विवाहाचे वय वाढवल्याने त्या अधिक बिघडतील असं त्यांनी म्हटलं आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार शफीफ उर रहमान वर्क यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. मोदी सरकारने मुलींना आता संवैधानिक अधिकार द्यायची तयारी केली असताना सपाच्या खासदारांचे हे वक्तव्य गुलामगिरीचे द्योतक आहे, मुलींनी नेहमी गुलीमीत ठेवण्याची मानसिकता यावरुन स्पष्ट होते असं मत राज्यसभेचे खासदार हरनाथ सिंह यांनी व्यक्त केलं.
विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. गुरुवारी केंद्रीय कॅबिनेटने या निर्णयाला मंजुरी दिली. सोमवारी संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. सध्या देशात मुलीच्या लग्नासाठी किमान 18 वर्षे वयाची अट आहे. गेल्या वर्षी या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सनं आपल्या अहवालात लग्नाचं किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्याची शिफारस केली होती. माजी खासदार जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. टास्क फोर्सनं आपल्या अहवालात आई बनण्याची वयोमर्यादा आणि महिलांशी संबंधित इतर समस्यांबाबतही आपल्या शिफारशी दिल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, सध्याची परिस्थिती लक्षात घेता लग्नाचं वय वाढवण्याच्या शक्यतेचा विचार करणार असल्याची घोषणा केली होती.
अबू आझमींचा विरोध
केंद्र सरकारच्या या निर्णयाला समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनीही विरोध केला आहे. खरा भारत हा शहरात नाही तर खेड्यांत वसतो, सरकराने हा निर्णय घेण्यापूर्वी खेडेगावांतील नागरिकांचा विचार करायला हवा होता असं त्यांनी म्हटलंय. 18 वर्षांनंतर मुलीचे काही बरंवाईट झालं तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का असा सवालही त्यांनी केला आहे. या वयोगटातील मुली काहीतरी वेडंवाकडं पाऊल उचलू शकतात, त्यामुळे ती प्रौढ झाली की पहिला तिचा विवाह केला जावा अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा असते. केंद्र सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :