Raise Marriage Age of Women from 18 to 21 : विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. कालच केंद्रीय कॅबिनेटने या निर्णयाला मंजुरी दिली. सोमवारी संसदेच्या अधिवेशनात हे विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. सध्या देशात मुलीच्या लग्नासाठी किमान 18 वर्षे वयाची अट आहे. मात्र या निर्णयात लवकरच बदल होऊ शकतो. कारण तशा हालचाली आता केंद्र सरकारनं सुरु केल्या आहेत.
सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत हे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून याविषयीचे संकेत दिले होते.
मुलींचे लग्नाचे किमान वय लवकरच 18 वरून 21 वर्षे केलं जाऊ शकतं. त्यासाठी सरकारने तयारी सुरु केली आहे. विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. सध्या या कायद्यात मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा 18 ठेवण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायद्यात बदल करण्याच्या दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या वर्षी या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सनं आपल्या अहवालात लग्नाचं किमान वय 18 वरून 21 वर्षे करण्याची शिफारस केली होती. माजी खासदार जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. टास्क फोर्सनं आपल्या अहवालात आई बनण्याची वयोमर्यादा आणि महिलांशी संबंधित इतर समस्यांबाबतही आपल्या शिफारशी दिल्या होत्या.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, सध्याची परिस्थिती लक्षात घेता लग्नाचं वय वाढवण्याच्या शक्यतेचा विचार करणार असल्याची घोषणा केली होती.