नवी दिल्ली : एक कुटुंब एक तिकीट, 50 वर्षांखालील नेत्यांना 50 टक्के पदं, एक व्यक्ती एका पदावर पाचच वर्षे, असे अनेक नवे निर्णय काँग्रेसने तीन दिवसांच्या नवसंकल्प शिबिरात जाहीर केले. रसातळाला पोहचलेल्या पक्षाला हे उदयपूर घोषणापत्र तारु शकणार का हा खरा प्रश्न आहे. 


2014 मध्ये राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून काँग्रेस एकापाठोपाठ एक पराभवाचे धक्के खात आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसचा विधानसभेत दारुण पराभव झाला, हाती असलेलं पंजाबही काँग्रेसने गमावलं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर हे चिंतन शिबिर पार पडलं. देशभरातले 400 काँग्रेस नेते, पदाधिकारी या शिबिरासाठी उपस्थित होते. त्याच मंथनातून पक्षाने आपली कार्यशैली बदलायचं ठरवलं आहे. 


या निर्णयांनी काँग्रेसचा कायापालट होऊ शकेल?



  • एक कुटुंब एक तिकीट, परिवारातल्या दुसऱ्या व्यक्तीला तिकीट हवं असल्यास तो किमान पाच वर्षे संघटनेत सक्रीय हवा ही अट

  • पक्षातली 50 टक्के पदं ही एससी, एसटी, अल्पसंख्यांक, महिला या वर्गासाठी आरक्षित ठेवणार

  • ताज्या राजकीय विषयांवर भूमिका ठरवण्यासाठी पॉलिटिकल अफेअर्स कमिटी, काही ठराविकच लोकांचं कोंडाळं अध्यक्षांच्या भोवती फिरतं असा आरोप G23 गटाने केल्यानंतर ही कमिटी नेमली आहे

  • याशिवाय इलेक्शन मॅनेजमेंट कमिटी, जी निवडणुकीचं काम पाहिल, प्रभारींच्या कामाचंही परीक्षण करेल

  • पब्लिक इनसाईट कमिटीही नेमण्यात येणार, ज्या माध्यमातून अध्यक्षांपर्यंत लोकांचा योग्य फीडबॅक पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे

  • संघटनेत एका पदावर एक व्यक्ती पाच वर्षेच काम करु शकेल, त्यानंतर तीन वर्षांचा कूलिंग पीरियड संपल्यानंतर दुसऱ्या पदावर काम करु शकेल. 


एक कुटुंब एक तिकीट असं काँग्रेसने जाहीर केलं असलं तरी त्यापुढे जो अपवाद लावला आहे, त्यामुळे जवळपास सगळ्याच राजकारण्यांची त्यातून सुटका होणार आहे. कारण पाच वर्षे सक्रीय असल्यास कुटुंबातली दुसरी व्यक्ती तिकीटासाठी पात्र ठरणार आहे. अगदी गांधी कुटुंबाचं उदाहरण घेतलं तरी प्रियंका गांधी 2019 पासून राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे 2024 ला त्याही तिकीटासाठी पात्र ठरतात. 


एक कुटुंब, एक तिकीटमध्ये नेमकं अडकणार कोण की सगळेच सुटणार?



  • अशोक गहलोत, कमलनाथ या काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांनीही निवडणूक लढवली आहे.

  • महाराष्ट्रातही सुशीलकुमार शिंदे- प्रणिती शिंदे, अमित देशमुख-धीरज देशमुख, अशोक चव्हाण-अमिता चव्हाण, विश्वजीत कदम आणि त्यांचे काका मोहनराव कदम अशी एकाच घरात सक्रीय असलेले नेत्यांची यादी आहे.

  • पण अर्थात पाच वर्षे सक्रीयतेची पात्रता यांनी पूर्ण केली असल्याने त्यांना या नियमाची अडसर नाही.

  • प्रश्न असेल तो यापुढच्या पिढीचा...तातडीने येऊन लगेच कुणाला घरात तिकीट दिलं जाणार नाही एवढाच या नियमाचा अर्थ

  • एकाच घरात पाच सहा नेते सक्रीय असल्याची उदाहरणं आता यापुढे नकोत अशी अपेक्षा राहुल गांधींनी व्यक्त केलीय


2 ऑक्टोबरला गांधी जयंतीचा मूहूर्त साधत काँग्रेसने काश्मीर ते कन्याकुमारी अशा भारत जोडो यात्रेचीही घोषणा केली आहे. महागाई, बेरोजगारीच्या मुद्यावर 15 जूनपासून देशभरात 100 ठिकाणी मेळावेही आयोजित केले जाणार आहेत. काँग्रेस बदलण्याचा नवसंकल्प तर करत आहे, पण मुळात पक्षसंघटनेच्या बदलासाठी घेतलेल्या या निर्णयांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होतेय हे पाहावं लागेल. त्यातूनच पक्षाचं भवितव्य ठरणार आहे.