Congress Chintan Shivir : भारतीय राजकारणात पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करण्यासाठी आता काँग्रेस पक्षाने मोठे संघटनात्मक निर्णय घेतले आहे. उदयपूर येथे पार पडलेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने या संघटनात्मक बदलाच्या ठरावांना मंजुरी दिली आहे. काँग्रेसमध्ये आता 'एक कुटुंब, एक तिकीट' असे धोरण लागू होणार आहे. त्याशिवाय पक्षात आता आरक्षणही लागू करण्यात आले आहे.
या वर्षाअखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांसह आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने कात टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मागील तीन दिवसांपासून राजस्थान येथील उदयपूर येथे 'नवसंकल्प चिंतन शिबिर' घेतले होते. या नवसंकल्प शिबिरात काँग्रेसने पक्षांतर्गत विविध मुद्यांवर चर्चा केली. उदयपूर येथील नवसंकल्प चिंतन शिबिरात काँग्रेसने 20 ठरावांना मंजुरी देत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
'एक कुटुंब, एक तिकीट धोरण'
पक्षात सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आणि वाढत्या घराणेशाहीला अटकाव करण्यासाठी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये 'एक कुटुंब, एक तिकीट धोरण' लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात सक्रिय होऊन निवडणूक तिकीट मिळवणाऱ्यांना चाप बसला जाईल असे म्हटले जात आहे. या नव्या धोरणानुसार, कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला तिकीट मिळू शकते. मात्र ती व्यक्ती पक्षात पाच वर्षांहून अधिक काळ सक्रिय असावी अशी अट घालण्यात आली आहे.
एका पदावर सलग पाच वर्ष
काँग्रेसने संघटनात्मक पदावर इतरांना संधी देण्यासाठीदेखील निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता संघटनेत आता एका पदावर एकाच व्यक्ती सलग पाच वर्ष काम करता येणार आहे. पाच वर्षानंतरचा तीन वर्षाचा अवकाश कालावधी पूर्ण केल्यानंतर त्या व्यक्तीला दुसऱ्या पदाची जबाबदारी मिळू शकते.
पक्षात आरक्षण धोरण
काँग्रेसने आपल्या पक्ष संघटनेत आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमधील पक्ष संघटनेत अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक आणि महिलांसाठी काही पदं राखीव ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे काँग्रेस पक्ष संघटनेत या घटकांना अधिक मोठी संधी मिळणार आहे. त्याशिवाय पदाधिकाऱ्यांपैकी 50 टक्के पदाधिकाऱ्यांचे वय हे 50 वर्षापेक्षा कमी असावे असा निर्णय घेण्यात आला आहे.