PM Modi Visit Nepal : आज बुद्ध जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी लुंबिनी, नेपाळमध्ये सुमारे 5 तासांच्या दौऱ्यासाठी असतील. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरून PM मोदींच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ लुंबिनीला पोहोचले आहे. मोदींच्या भगवान बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी येथील भेटीने भारत आणि नेपाळचे संबंध मजबूत होण्यास मदत होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा माया मंदिरात एकत्र पूजा करताना आणि अशोक स्तंभावर दिवा लावताना दिसतील. त्याचबरोबर, दोघांच्या उपस्थितीत लुंबिनीच्या बौद्ध विद्यापीठात भारतीय प्राध्यापकांच्या नियुक्तीसह अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत.


इंडिया चेअरची स्थापना होणार, भारतीय प्राध्यापकाची नियुक्ती होणार


लुंबिनी बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरू हृदयरत्न वज्राचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमधील करारानुसार विद्यापीठात इंडिया चेअरची स्थापना करण्यात येणार आहे. या अंतर्गत बौद्ध विषय शिकवण्यासाठी एका भारतीय प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.  लुंबिनी बौद्ध विद्यापीठात सेमिस्टर शिकवण्यासाठी दरवर्षी एका भारतीय प्राध्यापकाची नियुक्ती करेल. 'इंडिया चेअर'च्या स्थापनेसाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) आणि लुंबिनी बौद्ध विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार केला जाणार आहे. पंतप्रधान देउबा आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय दूतावासाचे वरिष्ठ अधिकारी, लुंबिनी बौद्ध विद्यापीठाचे अधिकारी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतील. विद्यापीठांमध्ये संशोधन आणि अभ्यासाला चालना देण्यासाठी देशांदरम्यान संबंध मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार करण्यात येत आहे. नेपाळने सुमारे दशकभरापूर्वी भारतातील काशी येथील बनारस हिंदू विद्यापीठात 'नेपाळ चेअर'ची स्थापना केली होती.


पंतप्रधान मोदींना मानद डॉक्टरेट पदवी देण्याचा कार्यक्रम होणार नाही


मात्र, पंतप्रधान मोदींच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना लुंबिनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बौद्ध अभ्यासाच्या विस्तारात त्यांच्या योगदानासाठी त्यांना ही पदवी देण्याची विद्यापीठाची योजना होती