(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प.बंगालच्या राजकारणात लवकरच रिव्हर्स मायग्रेशन होणार? मुकुल रॉय यांच्या तृणमूल परतीची जोरदार चर्चा
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीआधी रोज नव्या नेत्याची तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेशाची बातमी असायची. तृणमूलचे डझनभर आमदारही ऐन निवडणुकीआधीच ममतांना सोडून गेले. पण एका निकालाने ही सगळी गणितं बदलली आहेत. ममता बॅनर्जी यांचे जुने साथीदार मुकुल रॉय हे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या आहेत की त्यामुळे मुकुल रॉय यांच्या मनात नेमकं चाललंय काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या राजकारणात लवकरच नवा भूकंप होणार? निवडणुकांच्या आधी भाजपने सुरु केलेलं इनकमिंग आता आऊटगोईंमध्ये रुपांतरित होणार? ही चर्च सुरु झाली आहे मुकुल रॉय यांच्या काही भेटीगाठींमुळे. मुकुल रॉय..कधीकाळी ममता बॅनर्जी यांचे उजवे हात अशी त्यांची ओळख. पण 2017 मध्ये ते भाजपच्या गोटात दाखल झाले. मात्र आता बंगालमध्ये पुन्हा ममताच बॉस ठरल्यानंतर मुकुल रॉय यांना परतीचे वेध लागलेत का अशी चर्चा सुरु झाली आहे.
मुकुल रॉय यावेळी भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण त्यांचा मुलगा शुभ्रांशू पराभूत झाला. काही दिवसांपूर्वी शुभ्रांशू यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली, ज्यात तृणमूलबद्दलची सहानुभूती प्रकट झाली. त्यात मुकुल रॉय यांच्या पत्नी कृष्णा सध्या कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांना भेटण्यासाठी सर्वात आधी दाखल झाले ते तृणमूल काँग्रेसचे नेते.
ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी हा मुकुल रॉय यांच्या भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. बंद दाराआड त्यांची 10 ते 15 मिनिटे चर्चाही झाली. त्यानंतर बंगालच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाल्या..पण या केवळ वावड्या असल्याच भाजप नेते सांगत राहिले. त्यात काही संभाव्य धोका टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोनही मुकुल रॉय यांना गेला. त्यांनी फोनवरुन त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली.
भाजपचे 33 आमदार तृणमूलच्या संपर्कात?
- ममता बॅनर्जी यांनी प्रचंड बहुमतानं बंगालमध्ये वर्चस्व राखल्यानंतर अनेक नेत्यांना परतीचे वेध लागलेत
- भाजपच्या सोनाली गुहा निकालानंतर म्हणाल्या मी ममतांशिवाय जगूच शकत नाही, पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी अवस्था आहे माझी.
- फुटबॉलमधून राजकारणात आलेला दीपेंदू बिश्वास यानेही ममतांना पत्र लिहित पुन्हा तृणमूलचा झेंडा हाती घ्यायची इच्छा असल्याचं म्हटलं
- ममतांच्या आधीच्या मंत्रिमंडळात असलेले राजीव बॅनर्जी हे देखील भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत
- या सगळ्यात सर्वात मोठं नाव आहे ते मुकुल रॉय यांचं, त्यांनी निर्णय घेतला तर त्यांच्यासोबत येणाऱ्या आमदारांची संख्याही जास्त असू शकते
मुकुल रॉय तृणमूलमध्ये असताना ममतांचे उजवे हात म्हणून ओळखले जायचे. तृणमूलच्या प्रसारात त्यांचा मोठा वाटा होता. शारदा चीट फंड घोटाळ्यातलेही ते प्रमुख आरोपी आहेत. सध्या सीबीआय ही केस हाताळते आहे. भाजपने तृणमूलचा हा मोठा मासा गळाला लावला खरा, पण तरीही त्यांच्या हाती निवडणुकीत मात्र अपयशच आलं. मुकुल रॉय यांच्याबाबतीत तृणमूल परतीच्या बातम्या भाजपने पूर्णपणे फेटाळल्या आहेत.
मुकुल रॉय यांच्यापाठोपाठ तृणमूल सोडून भाजपमध्ये दाखल झालेले सुवेंदू अधिकारी यांचं प्रस्थ वाढत चाललं आहे. त्यामुळेही मुकुल रॉय अस्वस्थ असल्याचं सांगितलं जातं आहे. आता हे रिव्हर्स मायग्रेशन भाजप किती काळ रोखून धरणार हे पाहावं लागेल. निवडणुकीआधी असंच इनकमिंग चालू राहिलं तर ममता आणि त्यांचा पुतण्या हे दोघेच तृणमूलमध्ये राहतील असं भाजप नेते हिणवत होते. पण निवडणूक निकालाने ही सगळी गणितं बदलून टाकली आहेत.