एक्स्प्लोर
पत्नीच्या अदलाबदलीचा प्रकार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
"शक्ती सिंह राजावत हा अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायचा, मारहाणही करायचा. त्याचसोबत मित्रांसोबत पत्नी अदलाबदलीसाठीही दबाव आणत होता."

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपुरात वाईफ स्वॅपिंग म्हणजेच पत्नीच्या अदलाबदलीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारातील तणावग्रस्त पीडित विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. कानपुरातील तरुणीने 2015 साली उत्तर प्रदेशातीलच उरईत राहणाऱ्या रिअल इस्टेट एजंटचं काम करणाऱ्या शक्ती सिंह राजावत याच्याशी लगीनगाठ बांधली. लग्नानंतर सासरची मंडळी विवाहितेकडे वारंवार हुंड्याची मागणी करु लागली. कधी महागडी कार, तर कधी 35 लाख रुपयांची मागणी होऊ लागली. विवाहितेच्या माहेरच्या मंडळींची एवढी मोठी रक्कम किंवा कार देण्याची ऐपत नव्हती. या सगळ्याला कंटाळलेल्या विवाहितेला पतीनेही छळायला सुरुवात केली. "शक्ती सिंह राजावत हा अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायचा, मारहाणही करायचा. त्याचसोबत मित्रांसोबत पत्नी अदलाबदलीसाठीही दबाव आणत होता. मित्रांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठीही पती दबाव आणत होता", असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या सर्व प्रकाराविरोधात पीडित महिलेने पतीविरोधात 2016 साली पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र, या प्रकरणात आरोपींवरील गंभीर कलमं हटवल्याची माहिती पीडित महिलेला कळली. त्यामुळे आरोपींना पोलिस चौकशीत क्लीन चिट देण्यात आली. आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाल्याने पीडित महिला तणावग्रस्त झाली आणि तिने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच कुटुंबीयांनी पीडित महिलेला खाली उतरवल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडित महिलेचे अश्लिल फोटो काढून तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्नही केला गेला होता. या दिशेने पोलिसांनी आता तपासाची दिशा वळवली आहे.
आणखी वाचा























