Rahul Gandhi-Sanjay Raut : महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल संजय राऊतांना काय म्हणाले राहुल गांधी?
संसदेत पेगॅसिसच्या मुद्दयावर विरोधक एकत्रितपणे सरकारला धारेवर धरत आहेत. परवाच विरोधकांच्या एकत्रित संबोधनात संजय राऊत राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभे होते.
नवी दिल्ली : राजकीय वर्तुळात दिल्लीतल्या एका भेटीची सध्या जोरदार चर्चा रंगलीय. ही भेट जरी दिल्लीतली असली तरी ती महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. शिवसेना आणि काँग्रेस कधीकाळी राजकीय क्षितीजावरचे दोन ध्रुव वाटावेत अशी स्थिती आहे. पण महाराष्ट्रातल्या सत्ता समीकरणानं या दोन ध्रुवांना चांगलंच जवळ आणलंय. काल दिल्लीत शिवसेना खासदार संजय राऊत आणि राहुल गांधींची ही भेट यावरच शिक्कामोर्तब करणारी आहे.12 तुघलक लेन या राहुल गांधींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी या दोघांची ही भेट झाली. महाराष्ट्रातलं सरकार दीर्घकाळ चालावं ही इच्छा या भेटीत राहुल गांधींनी बोलून दाखवली असं नंतर संजय राऊत म्हणाले.
काल संध्याकाळी चारच्या सुमारास शिवसेना खासदार संजय राऊत हे राहुल गांधींच्या भेटीसाठी पोहचले. जवळपास सव्वा तास या दोघांमध्ये ही बैठक झाली. बाळासाहेबांबद्दल, शिवसेनेच्या संघटनात्मक वाटचालीबद्दल राहुल गांधी उत्सुकतेनं या भेटीत माहिती घेत होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत आणि राहुल गांधींमध्ये झालेली ही पहिलीच वन टू वन बैठक...त्या अर्थानं या भेटीचं महत्व वाढतं. एकीकडे राज्यात स्वबळाच्या विधानावरुन काँग्रेस- शिवसेनेत काही कुरबुरी झाल्या. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट सरकारमधला समतोल दाखवणारी आहे.
संसदेत पेगॅसिसच्या मुद्दयावर विरोधक एकत्रितपणे सरकारला धारेवर धरत आहेत. परवाच विरोधकांच्या एकत्रित संबोधनात संजय राऊत राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून उभे होते.राऊत बोलताना राहुल गांधींच्या चेह-यावरचे भावही बरंच काही सांगून जात होते. विरोधकांच्या एकजुटीत काँग्रेससोबत उभं राहणं, राहुल गांधींची अशी थेट भेट यामुळे आता शिवसेना यूपीएत सहभागी झाली असं म्हणायचं का? थेट यूपीएत सहभागी नसली तरी अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर मात्र शिवसेना काँग्रेसला साथ देतेय. आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेतल्या रणनीतीबाबत बोलावलेल्या बैठकीलाही शिवसेनेची आवर्जून उपस्थिती होती.
महाराष्ट्रातलं सरकार ज्यावेळी बनत होतं, त्यावेळी राहुल गांधी हे शिवसेनेसोबत जाण्यास फारसे अनुकूल नाहीत असं सांगितलं जात होतं. सत्तेत हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आता दीड वर्ष झालंय. एकीकडे संजय राऊत- पवार ही केमिस्ट्री चांगली असताना आता राऊत- राहुल गांधी ही देखील केमिस्ट्री बनणार का हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.