(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आमदारकीसाठी भवानीपूरमधून लढण्याची शक्यता, विद्यमान आमदारांचा राजीनामा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या ममता बॅनर्जी आमदारकीसाठी भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. टीएमसी आमदार सोवानदेव चटर्जी यांनी शुक्रवारी भवानीपूर येथील आमदारपदाचा राजीनामा दिला आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या ममता बॅनर्जी आमदारकीसाठी भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेसचे (टीएमसी) आमदार शोभन देव चटर्जी यांनी शुक्रवारी भवानीपूर येथील आमदारपदाचा राजीनामा दिल्याने आता ममता बॅनर्जी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार असल्याची दाट शक्यता आहे. भवानीपूर येथून मुख्यमंत्री ममता यांनी याआधी दोनदा विजय मिळविला होता.
चटर्जी यांनी सांगितलं की, याबाबत सर्व नेत्यांशी मी चर्चा केली आहे. ममता यांना तिथून निवडणूक लढवायची आहे. त्यामुळं मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर यासाठी कोणताही दबाव नाही. चॅटर्जी म्हणाले की, हा पक्षाचा निर्णय होता आणि मी त्याचे पालन करणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार चॅटर्जी हे खर्दा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते काजल सिन्हा यांच्या निधनानंतर तिथं पोटनिवडणूक होणार आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितले की, चटर्जी यांनी स्वेच्छेने अथवा बळजबरीने राजीनामा दिला आहे का? अशी त्यांच्याकडे चौकशी केली आहे. यावर त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याचं सांगितलं. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे, असं बिमान बॅनर्जी यांनी म्हटलंय.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जींना सहा महिन्यांच्या आता विधानसभेचं सदस्य व्हावं लागणार आहे. ममता बॅनर्जी यांना पुन्हा निवडणूक लढावी लागेल आणि विजयी व्हावं लागेल. यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. मात्र सहा महिन्यात विधानसभा सदस्य न झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही.
नंदीग्राममधून झाला ममतांचा पराभव
देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला.
ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी पाच मे रोजी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ममता बॅनर्जीना शुभेच्छा दिल्या. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 292 पैकी 213 जागांवर विजय प्राप्त केला आहे आणि सलग तिसऱ्यांदा सत्ता पटकावली आहे. भाजपला 77 जागांवर समाधान मानावं लागलं असून इतर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे.