(Source: ECI/ABP News/ABP Majha)
West Bengal | सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम, पंतप्रधानांच्या रॅलीतही नसणार
क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर सौरव गांगुली (Sourav Ganguly) राजकारणाच्या मैदानात सेकंड इनिंग सुरु करणार का? अशी चर्चा गेली काही दिवस रंगली होती. आता ती शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. (West Bengal Assembly Election 2021).
कोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कोलकातामध्ये एक मोठी रॅली होणार आहे. ब्रिगेड मैदानावर होणााऱ्या या रॅलीत पंतप्रधान बंगालच्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. या रॅलीत सौरव गांगुली सामील होणार नाही हे आतापर्यंत जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तो भाजपात प्रवेश करणार अशी गेली काही दिवस चर्चा सुरू होती, ती शक्यता आता संपुष्टात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी दोन वाजता कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर पोहोचणार आहेत. त्यानंतर जवळपास एक तास ते नागरिकांना संबोधित करणार आहेत. ही रॅली आतापर्यंतची सर्वात मोठी रॅली असल्याचं सांगण्यात येतंय. पंतप्रधानांच्या या रॅलीत जवळपास 10 लाख लोक सामील होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं जर झालं तर हे मैदान खचाखच भरून जाईल. या रॅलीमध्ये पंतप्रधानांसोबत भाजपचे खूप मोठे नेते सामील होणार आहेत.
पंतप्रधानांच्या आजच्या रॅलीमध्ये अभिनेता मिथुन चक्रवर्ती सामील होणार आहे. त्याने या आधी बंगालचे भाजप प्रभारी कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली आहे. गेली अनेक दिवस अशी चर्चा होती की भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. सौरव गांगुलीने त्या दरम्यान अनेक भाजप नेत्यांची भेट घेतली होती.
क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर सौरव गांगुली राजकारणाच्या मैदानात सेकंड इनिंग सुरू करणार का? अशी चर्चा रंगली होती. सौरव गांगुली आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्या भेटीनंतर सौरव गांगुली यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता.
सौरव गांगुली पंतप्रधानांच्या कोलकाता रॅलीत सामिल होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याच्या भाजप प्रवेशाची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 जानेवारी रोजी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. आपल्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. "गांगुली यांच्या हृदयात काही गंभीर ब्लॉक होते, त्यांना स्टेंट लावला आहे," असं वूडलॅण्ड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रुपाली बासू आणि डॉ. सरोज मंडल यांनी त्यावेळी सांगितलं होतं.