Weather Update : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह 'या' भागात पावसाचा अंदाज, देशाभरात आजचं हवामान कसं असेल?
IMD Weather Update : आज 26 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडूसह कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबई : देशात परतीच्या पावसाला सुरुवात (Weather Forecast) झाली असून काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. आज बुधवारी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांसह देशभरात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्येही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आज 26 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडूसह कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज आणि उद्या महाराष्ट्रासह देशभरातील काही ठिकाणी मुसळधार पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागात काही ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरात प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ईशान्य भारत आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
देशभरात आजचं हवामान कसं असेल?
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. लडाखमध्ये काही भागांत हिमवर्षाव तर काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून देशातून माघारी (Return Rain) फिरण्यास सुरुवात झाली आहे. 25 सप्टेंबरपासून वायव्य राजस्थानातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. IMD च्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. बीड, परभणी, सोलापूर, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून धोक्या इशारा दिला आहे. अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.