V K Singh On PoK : थोडा वेळ थांबा...पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होणार; व्ही. के. सिंह यांचे वक्तव्य
V K Singh On PoK : पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होणार असून थोडी प्रतीक्षा करा, असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जयपूर, राजस्थान : काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर पाकव्याप्त काश्मीर भारतात कधी विलीन होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. काही काळ थांबा, पीओके आपोआप भारतात विलीन होईल, असे सिंह यांनी म्हटले.
राजस्थानमधील दौसा येथे सिंग यांनी हे वक्तव्य केले. पाकव्याप्त काश्मीरमधील शिया मुस्लिमांसाठी भारतात येण्याचा मार्ग खुला करण्याबाबत त्यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होणार आहे. त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करा असेही केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी म्हटले.
दरम्यान, सिंग यांनी नुकत्याच पार पडलेल्या जी-20 परिषदेबाबत माहिती देताना म्हटले की, G-20 बैठक यशस्वी झाली आहे. असा संघटित कार्यक्रम यापूर्वी कधीही झाला नव्हता. देशातील 60 शहरांमध्ये सुमारे 200 बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. भारताने उत्तम प्रकारे G-20 परिषदेची आयोजन केल्याबद्दल इतर देशांनीदेखील कौतुक केले आहे.
या जी-20 परिषदेत जारी केलेल्या सामूहिक जाहीरनाम्यात भारताने मोठा विजय मिळवला असल्याचा दावा व्ही. के. सिंह यांनी केला. युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर जग विभागले गेले होते, परंतु पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दीपणाने आपण सर्वांनी मिळून एक मार्ग शोधून काढला. ज्यावर कोणत्याही देशाचा कोणताही आक्षेप नव्हता, असे सिंग यांनी म्हटले. भाजपच्या परिवर्तन संकल्प यात्रेत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
जैवइंधन अलायन्सची निर्मिती आणि भारत ते युरोप या कॉरिडॉरमुळे भारताच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, असे ते म्हणाले. काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही G-20 च्या संयुक्त घोषणेचे स्वागत केले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राजस्थानची निवडणूक मोदींच्या चेहऱ्यावर?
राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा मुख्यमंत्री चेहरा कोण असणार, असा प्रश्न केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ज्या राज्यात निवडणुका होतात तिथे भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करत नाही. तर पंतप्रधानांच्या करिष्म्यावरच निवडणूक लढवते. चांगला आणि ज्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे अशा नेत्यांना पक्ष संधी देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजस्थानमधील निवडणुकीत भाजप पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यामुळे आता कर्नाटकनंतर राजस्थानमध्ये भाजप पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.