Visakhapatnam Gas Leak : आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथील कंपनीत गॅस गळती, 50 जणांची प्रकृती गंभीर
Visakhapatnam Gas Leak : आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम येथील एका कंपनीत गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर प्रकृती खालावल्यामुळे 50 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Visakhapatnam Gas Leak : आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम येथील एका कंपनीत गॅस गळती (Gas Leak) झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर 50 लोकांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
अनकापल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अच्युतापुरम येथील एका केमीकल कंपनीत गॅस गळती झाली असून या घटनेत 50 जणांची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी या सर्वांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल केलं आहे.
Andhra | As per Anakapalle Police, a few women fell ill after a gas leak reported in a company located in Achutapuram. Some of them have been rushed to a local hospital. Police waiting for APPCB officials to arrive&assess situation. No one allowed inside premises. Details awaited
— ANI (@ANI) August 2, 2022
आंध्र प्रदेशचे उद्योगमंत्री गुडिवाडा अमरनाथ यांनी या घटनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. पीडितांना चांगले उपचार मिळावेत यासाठी पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास काही कर्मचारी कॅन्टीनमध्ये गेले होते. ते कामावर परतले तोपर्यंत गॅस गळती झाल्यामुळे काही महिला कर्मचाऱ्यांना उलट्या होऊ लागल्या. त्यांना तक्काळ जवळपास रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही विषारी वायूचा वास येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही गॅस गळती कशामुळे झाली याची तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, हा विषारी वायू जिथून लीक झाला, ती कापड बनवणारी कंपनी असल्याचे सांगितले जात आहे. दोन महिन्यांपूर्वीही अच्युतापुरम सेझमध्ये गॅस गळती झाली होती. त्यानंतर गॅस गळतीमुळे सुमारे 200 महिला कामगार आजारी पडल्या होत्या.






















