विनेश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न अन् अर्जुन पुरस्कार परत करणार; पंतप्रधानांना लिहिलं पत्र
पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात विनेश फोगटनं म्हटलं आहे की, साक्षी मलिकनं कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियानं त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केल्या आहेत. मी ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे.
Vinesh Phogat Major Dhyan Chand Award: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिग्गज कुस्तीपटूंनी विरोध सुरूच ठेवला आहे. अशातच, विनेश फोगटनं तिचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. विनेश फोगाटनं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून आपले पुरस्कार परत असल्याची घोषणा केली. मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न (Major Dhyan Chand Khel Ratna Award) आणि अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) परत करत आहे. मला या निर्णयापर्यंत आणल्याबद्दल सर्व ताकदवानांचे खूप आभार, असं विनेशनं पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
विनेश फोगटच्या निर्णयावर सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला की, मी निशब्द आहे. कोणत्याही खेळाडूला हा दिवस पाहावा लागू नये. बजरंग पुनियानंही आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी साक्षी मलिकनं कुस्ती सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता, अशातच साक्षीपाठोपाठ विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोघांनी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
विनेश फोगटनं पत्रात काय लिहिलंय?
विनेश फोगटनं पत्रात लिहिलंय की, "माननीय पंतप्रधान, साक्षी मलिकनं कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियानं त्याचं पद्मश्री परत केलं आहे. तुम्ही देशाचे प्रमुख आहात, त्यामुळे ही बाब तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच. मी विनेश फोगट, तुमच्याच घरतील मुलगी आहे आणि गेल्या एक वर्षापासून माझी काय स्थिती आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे.
फोगटनं पुढे लिहिलं की, मला आठवतं की, 2016 मध्ये साक्षी मलिकनं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं होतं, तेव्हा तुमच्या सरकारनं तिला 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या उपक्रमाची ब्रँड अॅम्बेसेडर बनवलं होतं. जेव्हा ही घोषणा झाली, तेव्हा देशातील सर्व महिला खेळाडू आनंदात होत्या आणि एकमेकांना अभिनंदनाचे संदेश पाठवत होत्या. आज जेव्हा साक्षीला कुस्ती सोडावी लागली, तेव्हा मला 2016 चा तो दिवस पुन्हा पुन्हा आठवतोय.
मैं अपना मेजर ध्यानचंद खेल रत्न और अर्जुन अवार्ड वापस कर रही हूँ।
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) December 26, 2023
इस हालत में पहुँचाने के लिए ताकतवर का बहुत बहुत धन्यवाद 🙏 pic.twitter.com/KlhJzDPu9D
आम्ही महिला खेळाडू फक्त सरकारी जाहिरातींवर दिसण्यासाठी आहोत का? असा सवाल विनेश फोगटनं उपस्थित केला आहे. त्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, कारण त्यामध्ये लिहिलेल्या घोषवाक्यांवरून तुमच्या सरकारला मुलींच्या उत्थानासाठी गांभीर्यानं काम करायचं आहे, असंच दिसतं. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण आता हे स्वप्नही धुळीस मिळत आहे. माझी एकच इच्छा आहे की, आगामी महिला खेळाडूंचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.
पुढे विनेश फोगाट म्हणाली की, तुम्ही (PM Modi) तुमच्या आयुष्यातील फक्त 5 मिनिटं काढा आणि त्या व्यक्तीनं मीडियामध्ये दिलेलं वक्तव्य ऐका. त्यानं काय केलं, ते तुम्हाला कळेल. तो (ब्रिजभूषण सिंह) टीव्हीवर उघडपणे महिला कुस्तीपटूंना अस्वस्थ, करण्याबाबत बोलला आहे.
आम्हाला देशद्रोही म्हटलं जातंय : विनेश फोगट
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात विनेश फोगाटनं लिहिलंय की, अनेकवेळा त्यांनी ही संपूर्ण घटना विसरण्याचा प्रयत्न केला, पण ते इतकं सोपं नाही. सर, जेव्हा मी तुम्हाला भेटलो, तेव्हा मी तुम्हाला हे सर्व सांगितलं. गेल्या वर्षभरापासून आम्ही न्यायासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, मात्र आमची कोणीही दखल घेत नाही.
सर, आमची पदकं आणि पुरस्कार 15 रुपये आहेत, असं सांगितलं जात आहे. पण ही पदकं आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय आहेत. जेव्हा आम्ही देशासाठी पदकं जिंकली, तेव्हा संपूर्ण देशाला आमचा अभिमान वाटायचा. आता आम्ही आमच्या न्यायासाठी आवाज उठवल्यावर आम्हाला देशद्रोही म्हटलं जात आहे.
फोगट यांनी विचारले की, पंतप्रधान मोदी, मला तुम्हाला विचारायचं आहे की, आम्ही देशद्रोही आहोत का? प्रत्येक स्त्रीला आयुष्य सन्मानानं जगायचं असतं. या कारणास्तव मला माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करायचा आहे.