नवी दिल्ली : मद्य सम्राट विजय मल्ल्याने भारत सरकारला दिलेली कर्ज परतफेडीची ऑफर स्वीकारुन आपल्याविरुद्ध सुरु असलेल्या केस बंद कराव्यात अशी मागणी केलीय. विजय मल्ल्याने भारत सरकारकडे यापूर्वी ट्वीटच्या माध्यमातून 100 टक्के थकित कर्ज भरण्यासाठी तयार असल्याचं कळवलं होतं. आताही त्याने याच मागणीचा पुनरुच्चार ट्वीटरच्या माध्यमातून केला आहे.


यापूर्वी डिसेंबर 2018 आणि मार्च 2020 मध्ये थकित कर्जाची परतफेड करण्याची तयारी दर्शवलेली होती. आताही त्याने ट्वीटरच्या माध्यमातूनच आपला प्रस्ताव दिला आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास केलेल्या या ट्वीटमध्ये त्याने भारत सरकारचं कोविड-19 आर्थिक पॅकेजसाठी अभिनंदन करतानाच, भारत सरकार त्यांना हव्या तेवढ्या चलनी नोटा छापू शकतं पण माझ्या सारख्या लहान घटकाकडे, जो त्याचं 100 टक्के थकित कर्ज परतफेड करायला तयार आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय माझ्याकडे थकित असलेल्या कर्जाची रक्कम स्वीकारा आणि माझ्याविरुद्ध सुरु असलेली सर्व प्रकरणे थांबवा. असं विजय मल्ल्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केलंय.



किंगफिशर एअरलाईन्स या विमान सेवा पुरवणाऱ्या पण सध्या दिवाळखोरीत निघाल्यामुळे बंद असलेल्या कंपनीचा प्रवर्तक असलेला विजय मल्ल्या याच्यावर नऊ हजार कोटी रुपयांच्या कर्जबुडवल्याचा आरोप आहे. आता त्याने ही सर्व रक्कम विनाअट परत करण्याची तयारी दाखवलीय.


मी कर्ज भरायला तयार, मात्र व्याज विसरा : विजय मल्ल्या


विजय मल्ल्या यांनी गेल्या दोन वर्षात ही कर्जफेडीची ऑफर तिसऱ्यांदा दिलीय. दोन वर्षांपूर्वी म्हणजे डिसेंबर 2018 ला, सर्व मुद्दल घ्या पण व्याज विसरा, अशी अट असलेला पर्याय दिला होता. त्यानंतर मार्च 2020 मध्येही त्याने परतफेडीचा पर्याय दिला होता.


दरम्यान, ब्रिटनमधील न्यायालयात त्याचं भारतात हस्तातरण करण्याविषयीचा खटला अंतिम टप्प्यात आहे. लंडनच्या हायकोर्टातील हस्तांतरणाला विरोध करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आल्यानंतर विजय मल्ल्याने ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


संबंधित बातम्या :


कर्जबुडव्या विजय मल्ल्या अखेर फरार घोषित


इंग्लंडमध्ये विजय मल्ल्याला पाहून लोकांची 'विजय मल्ल्या चोर है' घोषणाबाजी


कर्ज फेडण्यासाठी मी दोन वर्षांपूर्वीच सरकारला पत्र लिहिलं : विजय मल्ल्या