नवी दिल्ली : भारतीय बँकाचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याने कर्ज फेडण्यासंदर्भात बँकांसमोर नवीन प्रस्ताव ठेवला आहे.आपण 100 टक्के कर्ज फेडायला तयार आहे, अशा आशयाचा ट्वीट करुन विजय मल्ल्या यांनी फक्त कर्जाच्या मुद्दलच परतफेड करु शकतो, मात्र व्याजाची रक्कम देऊ शकणार नाही, असं स्पष्ट केलंय. मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी आज एका पाठोपाठ चार ट्वीट करुन भारतीय बँकांसमोर कर्जफेडीचा नवा प्रस्ताव सादर केला आहे.


मागील तीन दशकांपासून किंगफिशरसारखी मोठी मद्य कंपनी भारतात व्यवसाय करत होती. त्यातून भारत सरकारला कोट्यावधी रुपयांच्या कराचा लाभ झाला. तसेच किंगफिशर एअरलाईन्स प्रवाश्यांच्या सेवेत होती. मात्र ती बुडाली. तरीही मी कर्ज फेडायला तयार आहे, माझा प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंती विजय मल्ल्याने ट्वीटरद्वारे केली आहे.

तेलाच्या वाढत्या दरामुळे किंगफिशर एअरलाईन्स बुडाली

किंगफिशर एक शानदार विमान वाहतूक कंपनी होती. मात्र त्यावेळी कच्च्या तेलाचे भाव 140 डॉलर प्रतिबॅरल पर्यंत पोहोचले. त्यामुळे एअरलाईन्सला तोटा सहन करावा लागला. या वाढत्या इंधनाच्या किंमतीतच बँकांनी दिलेलं भांडवल जिरलं, म्हणून किंगफिशर एअरलाईन्स बंद करावी लागली, असंही मल्ल्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केलंय.
माध्यम आणि नेत्यांवर सुड

विजय मल्ल्या यांनी भारतीय प्रसार माध्यमे आणि राजकीय नेत्यांवरही आपल्या ट्वीटमधून टीका केलीय. "मी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं कर्ज बुडवून पळून गेलो, अशी प्रतिमा माध्यमे आणि राजकारण्यांनी तयार केली. मात्र हे पूर्णपणे खोटं आहे. मी कर्नाटक उच्च न्यायालयात सर्वसमावेशक तडजोडीचा प्रस्ताव दाखल केला होता, त्यावेळी कोणी काही बोलले नाही. असं सांगून विजय मल्ल्या यांनी त्यांच्यासोबत दुजाभाव झाल्याचा आरोप केला.

10 डिसेंबरला सुनावणी

मल्ल्या प्रकरणावर लंडनच्या वेस्टमिंस्टर कोर्टात 10 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्याला याप्रकरणी भारतात आणल जाऊ शकत. हे प्रकरण अंगलट येत असल्याचं दिसताच त्याने हा नवीन प्रस्ताव ठेवला आहे. आता या प्रस्तावाला बँका मान्य करतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.