नवी दिल्ली : कर्ज परत करण्याचे आपण पुरेपूर प्रयत्न केले, असा दावा भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे. त्याचबरोबर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण पत्र लिहिलं होतं, असंही मल्ल्याने म्हटलं आहे.


कर्जफेड न करता पळून गेलेल्या विजय माल्यावरून देशभरात मोठा गदारोळ झाला होता. यावर विजय मल्ल्या म्हणाला, “मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना 15 एप्रिल 2016 ला पत्र लिहिलं होते, पण मला कोणतंच उत्तर देण्यात आले नाही. आता सर्व गोष्टी समोर याव्यात यासाठी ही पत्र मी सार्वजनिक करत आहे.”


पुढे बोलताना विजय मल्ल्याने म्हटलं, “राजकीय नेत्यांनी आणि माध्यमांनी माझ्यावर अशा प्रकारे आरोप केले की किंगफिशरला देण्यात आलेलं 9 हजार कोटींचं कर्ज मीच चोरून पळून गेलो आहे. काही बँकांनीही मला जाणीवपूर्वक कर्जबुडव्या ठरवलं.”

मी बँकांचे कर्ज परत करण्याचा प्रयत्न करतोय पण बँकांना चुना लावणाऱ्यांचा ‘पोस्टर बॉय’ अशी माझी प्रतिमा तयार केली गेली, असंही मल्ल्याने म्हटलं आहे. पुढे बोलताना माल्याने ईडी आणि सीबीआयने केलेल्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. माझी एकूण 13900 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली असल्याचं मल्ल्याने म्हटलं आहे.

एकूणच या पत्राद्वारे मल्ल्याने स्वत:ला फारच साळसूद असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

बँक फसवणूक प्रकरणात 2017 साली पहिला खुलासा करण्यात आला. मद्य व्यावसायिक आणि किंगफिशर विमान कंपनीचा मालक असलेल्या विजय मल्ल्याने आयडीबीआय आणि अन्य काही बँकांचे मिळून 9500 कोटींचे कर्ज बुडवल्याचे उघड झाले. त्यानंतर पळून गेलेला विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये राहात आहे. मल्ल्याला भारताकडे सोपवण्यात यावं, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत. इंग्लंडच्या न्यायालयातही मल्ल्याविरोधात केस चालू आहे.