मुंबई : भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळालेला कर्जबुडव्या विजय मल्ल्या विश्वचषकातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी भारतीय प्रेक्षकांनी विजय मल्ल्याच्या नावाने घोषणाबाजी केली. 'विजय मल्ल्या चोर है' अशा घोषणा भारतीय प्रेक्षकांनी दिल्या.


इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर भारत वि. ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यासाठी विजय मल्ल्या पोहोचला होता. सामना संपल्यानंतर मल्ल्या स्टेडियम बाहेर आला, त्यावेळी भारतीय प्रेक्षकांनी त्याला घेरलं आणि 'विजय मल्ल्या चोर है' घोषणाबाजी सुरु केली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.



या घोषणाबाजी दरम्यान विजय मल्ल्याची आई देखील सोबत होती. माझ्या आईला याबाबत त्रास होता कामा नये, असं विजय मल्ल्याने उपस्थितांना म्हटलं. गर्दीने मल्ल्याला घेरल्यानंतर सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करुन त्याला सुरक्षित बाजूला नेलं. पत्रकारांनी विजय मल्ल्याला अनेक प्रश्न विचारले मात्र त्याने उत्तरे देणं टाळलं.





काय आहे विजय माल्ल्या प्रकरण?


किंगफिशर एअरलाईन्स’च्या नावे घेतलेलं बँकांचं सुमारे 9,000 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये पसार झाला आहे. मल्ल्या देशाबाहेर पळून गेल्याने भारत सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. तेव्हापासून मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते. विजय माल्ल्याचे सध्या लंडनमध्ये वास्तव्य आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे.