(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uttarakhand : पुष्कर सिंह धामी आज घेणार उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची उपस्थिती
आज पुष्कर सिंह धामी हे दुसऱ्यांदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज दुपारी अडीच वाजता त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.
Pushkar Singh Dhami Oath-taking Ceremony : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. पाचपैकी चार राज्यात भाजपला बहुमत मिळालं आहे. यातील मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, आज पुष्कर सिंह धामी हे दुसऱ्यांदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज दुपारी अडीच वाजता त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहणार आहेत.
पुष्कर सिंह धामी आज दुसऱ्यांदा उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. डेहराडून येथील परेड ग्राउंडवर शपथविधी सोहळा होणार आहे. पुष्कर सिंह धामी दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत धामी यांचा पराभव झाला होता. तरीदेखील भाजपन त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. उत्तराखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा भाजप सरकार पुन्हा सत्तेत येत आहे. त्यामुळं या विक्रमी विजयाला भव्यदिव्य करण्यासाठी परेड ग्राऊंड सज्ज झाले आहे. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव सहभागी होणार आहेत. यासोबतच शहरातील संत, प्रज्ञावंत, सर्वसामान्यांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
परेड मैदानात एक हजार पोलिसांचा बंदोबस्त
दरम्यान, आजच्या या सोहळ्यासाठीआमदार, मंत्री आणि व्हीआयपींना बसण्यासाठी तीन स्वतंत्र व्यासपीठ उभारण्यात आले आहे. हेलिपॅड देखील करम्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक हजार पोलीस परेड ग्राऊंडमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. येथे 25 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
धामींच्या मंत्रीमंडलात या नेत्यांचा समावेश?
गणेश जोशी
धनसिंग रावत
सतपाल महाराज
रेखा आर्या
अरविंद पांडे
प्रेमचंद्र अग्रवाल
मदन कौशिक
बिशनसिंग चुफळ आणि बन्सीधर भगत यांच्यापैकी एकजण विधानसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे.
या तरुण चेहऱ्यांना मिळू शकते संधी
रितू खंडुरी
सौरभ बहुगुणा
शिव अरोरा
विनोद चमोली
मोहन सिंग बिश्त
मोहन सिंग बिश्त यांनी लालकुवा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हरीश रावत यांचा पराभव केला.